आज नाशिक येथे 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यानिमित्ताने कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी शासन आपल्या दारी उपक्रमासह जिल्ह्यातील विकासाबाबत अनेक विषय मांडले.
अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण प्रकल्प असलेला 'शासन आपल्या दारी' महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह आदिवासी बांधव, तरुण बेरोजगार यांचे प्रश्न सोडविण्यात येईल. त्यासाठी लागणारा निधी पुरविण्यात येईल. त्यानुसार नाशिक जिल्ह्याच्या कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
यापूर्वी लाभार्थ्यांना अनेकदा हेलपाटे माराव्या लागत होते, त्यामुळे शेवटच्या माणसाला मदत होत नसायची, मात्र आता 'शासन आपल्या दारी'तून घरघरापर्यंत योजना पोहचत आहेत, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात 112 शिबिरे झाली असून अकरा लाख लोकांना फायदा झाला आहे. यात आदिवासी बांधव, ओबीसी, अल्पसंख्याक बांधवाना अधिकाधिक मदत मिळाली पाहिजे, असही पवार म्हणाले.