महाराष्ट्रात (Maharashtra ) कुठलीही मोठी घटना घडली की त्यात शरद पवारांचा (Sharad Pawar )हात असल्याची चर्चा सुरू होते. त्याचाच प्रत्यय 2019 मध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांनंतर आला. त्यावेळी पहाटे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत जाऊन अजित पवारांनी (Ajit Pawar)राजभवनावर जाऊन सरकार स्थापन केलं होतं. त्या विषयाच्या अनुषंगानं सध्या महाराष्ट्रात पुन्हा राजकीय शिमगा पेटलाय. त्या सत्तास्थापनेच्या मागेही शरद पवारच होते, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मग शरद पवारांनीही तात्काळ हा दावा खोडून काढतांना मी गुगली टाकल्याचं वक्तव्य केल्यानं, शरद पवारांच्या गुगलीची जादू आजही महाराष्ट्राच्या राजकारणात कायम असल्याचं हेच पुन्हा सिद्ध झालंय.
मॅक्स महाराष्ट्रच्या " हा बोलला, तो बोलला" या विशेष सेगमेंटमधून आम्ही गुगलीचा विषय त्यांच्याच शब्दात एकत्रित मांडलाय. गुगलीच्या विषयाला सर्वात आधी फडणवीसांनी सुरूवात केली होती. एका सभेत त्यांनीच पहाटेच्या शपथविधीचा विषय छेडला आणि मग आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली. पुलोदचं सरकार स्थापन करतांना शरद पवारांनी त्यावेळी जे काही केलं ती मुत्सद्देगिरी होती आणि एकनाथ शिंदेंनी जे केलं ते बंड ? असं कसं चालेल, असा प्रश्न फडणीसांनी उपस्थित केला. त्यावर शरद पवारांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले, पुलोद चं सरकार स्थापन झालं त्यावेळी फडणवीस कदाचित लहान असतील, त्यामुळं त्यांना पूर्ण माहिती नसावी, अज्ञानापोटी ते बोलले असतील, असा खुलासा पवारांनी केला.
आता पवारांच्या या वक्तव्यावर फडणवीस प्रतिक्रिया देणार नाही, असं कसं होईल ? फडणवीसांनीही मग मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ मी लहान असेलही त्यावेळी, मात्र इतिहास कसा लपवता येईल. फडणवीसांच्या या प्रतिक्रियेवर मग पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी गुगली टाकली होती, त्यावर ते बोल्ड झाले, त्यांची विकेट गेली...विकेट गेल्यावर ती गेली म्हणून सांगायचं नसतं...फडणवीसांनीही मग मुरलेल्या राजकारण्यासारखचं मिश्किल प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, मला अतिशय आनंद आहे की, पवार साहेबांना सत्य सांगावे लागले. त्यांच्या गुगलीमुळे मी बोल्ड होण्याऐवजी त्यांचे पुतणेच बोल्ड झाले. अजून अर्धेच सत्य बाहेर आले, पूर्ण सत्यही लवकरच बाहेर येईल. असा मिश्किल इशाराच त्यांनी दिला.
दरम्यान यावर आता पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी उत्तर दिल आहे. ते म्हणालेत की "मी जाहीर बोललो होतो की कोणाला सत्ता स्थापनेसाठी आमदार कमी पडत असतील तर राष्ट्रवादी तुम्हाला मदत करेल बाहेरून पाठिंबा देईल. त्यांनी तिथेच पत्रकारांना देखील विचारलं की, माझं हे वक्तव्य आठवतय का कोणाला ? निवडणूक झाल्या नंतर बाहेरून पाठिंबा द्यायची भूमिका होती. ज्यावेळेला ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेला दिली होती. नंतर त्यांची वेळ आली नाही. त्यांच्याबद्दल फार कौतुक नव्हत. परंतु त्यांच्या विचारांमध्ये कसं अंतर पडेल याची काळजी घेत होतो. आमच्या भेटीची गोष्ट खरी आहे. पण फडणवींसानी स्वत:च सांगितले की याच दोन दिवसात शरद पवारांनी भुमिका बदलली. मग त्यानंतरच्या दोन दिवसांनी पहाटे चोरुन शपथ घेण्याचं काय कारण होतं. त्यांना पाठिंब्याची खात्री होती आणि शपथ घेतली मग दोन दिवसात ते सरकार राहिले का तिथे दोन दिवसात त्यांची सत्ता गेली. त्यांना त्यांचा राजिनामा द्यावा लागला. याचा स्पष्ट अर्थ आहे. सत्तेसाठी कुठेही जाण्याची त्यांची पावलं सर्वांसमोर यावी या दृष्टीने करण्यात आली. ते पुढे म्हणाले की ते फसले का? उद्या मी सांगितले तुम्हाला गव्हर्नर करतो या शपथ घ्यायला, लगेच शपथ घ्यायला याल का? पत्रकारांनी फडणवीस फसले कि मोदी फसले असे विचारले असता पवारांनी सांगितले की सत्तेशिवाय करमत नव्हते ते मोदी नव्हते ते राज्यातले होते, असा टोलाही त्यांनी फडणवींसांना लगावला. सत्तेसाठी आम्ही किती अस्वस्थ आहोत, जगू शकत नाही हि फडणवीसांची अस्वस्थता ही एकदा महाराष्ट्रासमोर येण्याची आवशक्यता होती. असही पवार म्हणाले.
यावर रिपाइं अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रीया दिली असुन ते म्हणाले, " उद्धव ठाकरेंची शिवसेना क्लिन बोल्ड झाली आहे. उद्धव ठाकरेंना एका बॉलमध्ये आऊट केलं आहे. आमदार कमी पडले म्हणून अजित पवार गेले फडणवीसां सोबत गेले हा संशोधनाचा विषय असून अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असल्याचं देखील आठवले म्हणाले.
या एकूणच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या गोंधळात एक गोष्ट मात्र प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे, शरद पवारांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीत, त्यांच्या गुगलीची दहशत किंवा जादू आजही महाराष्ट्राच्या राजकारणावर तितकीच प्रभावी असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.