विधानसभा निवडणूका जसजश्या जवळ येत आहेत तसतसे राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. या निवडणूकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बोलबाला अधिक असल्याचे दिसून येतंय. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव सदाशिवराव पाटील हे तुतारी हातात घेणार आहेत. येत्या काही दिवसात हा पक्ष प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. वैभव पाटील यांच्या बॅनरवरून याच आठवड्यात घड्याळाचे चिन्ह देखील गायब झाले आहे. वैभव पाटील हे खानापूर आटपाडी मतदारसंघातील महत्वाचे नेते असून स्वच्छ सर्वेक्षणात विटा शहराचा देशात प्रथम क्रमांक आणण्यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले होते. खानापूर आटपाडी मतदार संघात लोकनेते हणमंतराव पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा राजकीय वारसा त्यांना आहे. मतदारसंघात तरुणांमध्ये त्यांचे विशेष संघटन आहे.
खानापूर आटपाडी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीचे चित्र काय ?
शिवसेना शिंदे गटाने या अगोदरच दिवंगत आ. अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना उमेदवारी घोषित केली आहे. गेल्या आठवड्यात आटपाडीतील ज्येष्ठ नेते राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाला ही जागा सुटण्याची शक्यता आहे. राजेंद्र अण्णा देशमुख यांची आटपाडी परिसरात मोठी ताकद आहे. अॅड. वैभव पाटील यांचे वडील माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी तब्बल दोन टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग दोन्ही तालुक्यांमध्ये आहे. राजेंद्र अण्णा देशमुख आणि वैभव सदाशिवराव पाटील यांनी एकमताने ही निवडणूक लढल्यास सुहास बाबर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेचा देखील मोठा परिणाम या निवडणुकीच्या निकालावर असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिवंगत आ. अनिल बाबर विश्वासू सहकारी होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या मतदारसंघाकडे विशेष लक्ष आहे. त्यामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघातील लढाई प्रतिष्ठेची मानली जात आहे.