मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे यांनी आंदोलन छेडले होते. त्यावर लाठीचार्ज झाल्यानतंर हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. त्यातच विजय वडेट्टीवार यांनीही मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीला आमचा पाठींबा असेल, असं वक्तव्य केलं होत. त्यावर शरद पवार यांनी उत्तर देत मराठा समाजासाठीचा आरक्षणाचा फॉर्म्युला सांगितला.
ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याला काँग्रेसचा पाठींबा असल्याचे म्हटले होते. त्यावर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शरद पवार म्हणाले, ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देणे म्हणजे ओबीसी समाजातील गरीब लोकांवर अन्याय असल्याचं काही लोकांचं मत असल्याचे शरद पवार म्हणाले. त्याबरोबरच केंद्र सरकारने संसदेत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठी मंजूरी द्यावी. त्यानंतर 15 ते 16 टक्क्यांची मर्यादा वाढवली तर आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघू शकतो, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यावर आता शरद पवार यांनी उत्तर देत फॉर्म्युला सांगितला आहे. मात्र केंद्र सरकार यावर निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण देईल का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
यावेळी लाठीचार्जच्या मुद्द्यावरूनही शरद पवार यांनी सरकारला टोला लगावला. शरद पवार म्हणाले, तुम्ही म्हणता आम्ही लाठीचार्जचे आदेश दिले नाहीत. पण आदेश कुणी दिले, लाठीचार्ज कुणी केला, हे सगळं शोधण्याचं काम सरकारचं आहे. कारण सरकारकडे अधिकार आहेत, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.