एमआयएम राष्ट्रवादी आघाडी होणार का? शरद पवार यांनी केले स्पष्ट

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ऑफर दिल्यामुळे गेले दोन दिवस राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. तर त्यावर सर्व पक्षांनी आपली भुमिका मांडली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी एमआयएम राष्ट्रवादी आघाडी होणार का? याबाबत आपली भुमिका स्पष्ट केली आहे.;

Update: 2022-03-21 03:16 GMT

राज्यात महाविकास आघाडी विरुध्द भाजप संघर्ष रंगला असतानाच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आघाडीची ऑफर दिली. त्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. तर एमआयएमने दिलेल्या प्रस्तावावर सर्व पक्षांनी आपली भुमिका स्पष्ट केली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एमआयएम राष्ट्रवादी आघाडी होईल का? याबाबत बारामती येथे पत्रकारांशी बोलताना आपली भुमिका स्पष्ट केली.

यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना शरद पवार म्हणाले की, कोणी कोणत्या पक्षासोबत जायचे हा त्यांचा स्वतःचा निर्णय असेल. मात्र ज्या पक्षांसोबत जायचे आहे. त्या पक्षांनी प्रस्तावावर होकार द्यायला हवा. कारण हा राजकीय निर्णय आहे आणि महाराष्ट्रापुरता विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणालाही देत नाही. याबाबत राष्ट्रीय समिती निर्णय घेत असते. परंतू राष्ट्रीय समितीने अजूनतरी असा कुठला निर्णय घेतला नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट करत एमआयएम राष्ट्रवादी आघाडी होण्याची शक्यता फेटाळून लावली.

एमआयएम राष्ट्रवादी आघाडीची चर्चा का सुरू झाली?

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या आईचे निधन झाल्यामुळे राजेश टोपे जलील यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी अनौपचारिक चर्चेत एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप टोपे यांनी केला. त्यावर जलील म्हणाले की, आमचा जर भाजपला फायदा होत असेल तर तुम्ही आमच्यासोबत या, असे सांगत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला भाजपविरोधात एकत्र येण्याची ऑफर दिली. त्यामुळे राज्यात एमआयएम राष्ट्रवादी आघाडीची चर्चा सुरू झाली. मात्र या चर्चेचा धुरळा उडवून देऊन एमआयएम औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर एमआयएमची महाविकास आघाडीत एन्ट्री झाली तर शिवसेनेला औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूकीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलता येणार नाही. तर एमआयएमवर करण्यात येत असलेल्या आरोपांपासूनही एमआयएमची मुक्ती होऊ शकते, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.


Tags:    

Similar News