'शिवसेनेचं बोट धरुनच मोठे झालात हे विसरु नका' ; शंभुराज देसाईंचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
सातारा// शिवसेना नेते गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटलांनी नैराश्यापोटी वल्गना सुरु केल्या आहेत. आपण सेनेचं बोट धरुन मोठे झालात हे विसरु नका, असा इशारा शंभुराज देसाई यांनी चंद्रकांत पाटलांना दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फटलणच्या कार्यक्रमामध्ये टीका केली होती.
चंद्रकांत पाटील यांनी देशाच्या राजकारणात जायचं असेल तर घराच्या बाहेर पडावं लागतं अशा पद्धतीची टीका त्यांनी मुख्यमंत्र्यावर केली होती. या वक्तव्यावर गृहराज्यमंत्री देसाई यांनी पत्रकार परिषदेतून चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढविला. उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या या आरोपांना कोणताही आधार नाही.तसंच चंद्रकांत पाटील हे सगळं त्यांना आलेल्या नैराश्यातून बोलुन वेगवेगळ्या वल्गणा करत आहेत, अशी टीका देसाई यांनी केली.
तुमचे खासदार आमच्या जीवावरचं निवडून आलेत,
तुमचे महाराष्ट्रात निवडून आलेले खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत त्यामुळं आमच्यावर असे आरोप करु नका, अशी तंबीच शिवसेना नेते शंभुराज देसाईंनी चंद्रकांत पाटलांना दिली. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचं बोट धरुनच भाजप पुढं आलं आहे हे विसरु नका. बाळसाहेब ठाकरेंचं बोट धरुनच ग्रामीण भागात तुमचा पक्ष वाढलाय हे माहिती करुन घ्यायचं असेल तर अडवाणींना विचारा असा सल्ला सुद्धा त्यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.
भाजपाची आताची सूत्र ज्यांच्या आहात आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींचं विस्मरण झालंय का? असा प्रश्न करीत आमच्या 18 खासदारांवर तुम्ही बोलू नका निवडणुकीत युती असल्याने प्रत्येकानं प्रत्येकाला या ठिकाणी मदत केल्यामुळंच दोघांचे खासदार निवडुन आलेत. शिवसेनेच्या जीवावर सुद्धा भाजपाचे खासदार निवडून आलेत हे विसरु नका आता पुढच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपाला जागा दाखवून देईल, असा इशारा देसाई यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.