राज्यात नुकत्याच ७ हजार ६८२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. किरकोळ वाद-विवाद, दगडफेकीच्या घटना सोडल्या तर निवडणूका शांततेत पार पडल्या. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात या निवडणूकीच्या निकालाचा वेगळाच परिणाम पाहायला मिळाला.
दौलताबाद इथं रामभाऊ धोंडिबा दवंडे यांची सात एकर बागायती शेती आहे. या शेतात त्यांनी पपईची ७०० झाडे लावली होती. दवंडे यांच्या सुनेने वॉर्ड क्रमांक १ मधून निवडणूक लढवली आणि त्या निवडूनही आल्या. तर पराभूत झालेल्या विरोधकांनी मनात राग ठेवून रात्रीच्या सुमारास दवंडे यांच्या शेतातील सुमारे साडेतीनशे झाडे तोडून टाकली. विशेष म्हणजे या झाडांना १ हजार पेक्षा अधिक पपया लागल्या होत्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी रामभाऊ दवंडे शेतात गेल्यावर, हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यामुळे दवंडे कुटुंबियांवर आर्थिक डोंगर कोसळला आहे. रामभाऊ यांचे सुमारे चार लाखांचे नुकसान झालेले आहे. रामभाऊ यांनी त्वरित दौलताबाद पोलिस ठाण्यात जाऊन विरोधकाच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली.
बागायतदार शेतकरी रामभाऊ यांनी पपईच्या बागेची लागवड करण्यासाठी बँकेतून मोठ्या प्रमाणात पीक कर्जही घेतले होते. विरोधकांच्या या कृत्यामुळे कर्ज फेडायच तरी कसं असा प्रश्न दवंडे यांना सतावत आहे. गावपातळीवरच्या राजकारणात विरोधक एवढ्या खालच्या थराला जाऊन असं काही करतील याची कल्पना रामभाऊ दवंडे यांना यापूर्वी आली नसावी. परंतू राजकारणामुळेच शेतकऱ्याच्या बागेच नुकसान होणं म्हणचे आभाळ फटल्यासाऱख आहे असं रामभाऊ यांनी म्हटलं आहे.