अण्णा हजारेंच्या मौनावर देश बचाव जनआंदोलनाने खदखद केली व्यक्त
अण्णा हजारेंच्या मौनावर देश बचाव जनआंदोलनाने खदखद व्यक्त करत , देश बचाव जनआंदोलन समितीने थेट राळेगणसिद्धी येथे उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला;
देशातील जाचक कृषी कायदे, वाढती बेरोजगार, वाढती महागाई आणि अवाच्या सव्वा केलेली इंधन दरवाढ यामुळे एकीकडे नागरिक हैराण असताना, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे चकार शब्द काढत नाहीत अस म्हणत देशातील परिस्थितीवर अण्णांनी भूमिका घ्यावी, अशी खदखद पुण्यातील देश बचाव जनआंदोलन समितीने व्यक्त केली.
देशाच्या या परिस्थितीबाबत अण्णानी भूमिका घेतली नाही तर थेट राळेगणसिद्धी येथे जाऊन केंद्र सरकारविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा समितीचे प्रमुख ऍड. रवींद्र रणसिंग यांनी केली. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी रणसिंग पवार, मारोती भापकर, विकास देशपांडे, रवींद्र देशमुख, अभय भोर, दीपक पाटील, दुर्गा भोर, सुरसे, संदीप बर्वे, मुकुंद काकडे आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर अण्णांना पत्र पाठवून आंदोलनाचं नेतृत्व करा, अशी विनंती करण्यात येणार आहे.
सध्या देश अत्यंत भयानकतेकडे वाटचाल करीत आहे. अविचारी नोटबंदीनंतर देशाची मोठी आर्थिक हानी झाली, कोरोना लॉकडाऊन, वाढती महागाई, बेरजोगारी यामुळे संपूर्ण देशातील सामान्य जनता भरडली जात आहे असं समितीने म्हंटले आहे.
भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अत्यंत बेजबाबदार नोटबंदी करण्यात आली. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. उद्योग व्यवसाय बंद झाले. बेजबाबदार निर्णयांमुळे सरकारचे कराचे उत्पन्न घटले. ही वित्तीय तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने सामान्य जनतेची लूट सुरू केली आहे. त्यासाठी भरमसाठ इंधन दरवाढ करण्यात आल्याचा आरोप रणसिंग यांनी केला.
देशातील पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आहेत. यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. देशात एवढं सगळ होत असताना अण्णा हजारे मात्र गप्प आहेत. भ्रष्टाचारातून देश बाहेर काढण्यासाठी आमच्यापैकी अनेकजण अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र आता देश अडचणीत असताना अण्णा चकार शब्द काढत नाहीत. पुढील १५ दिवसांत अण्णांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर आमचं नेतृत्व करावं अन्यथा आम्ही राळेगणसिद्धी येथे जाऊन केंद्र सरकारविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचं, मारोती भापकर यांनी म्हटलं.
जगात सर्वात महाग पेट्रोल, डिझेल व गॅस भारतीय नागररकांना खरेदी करावा लागतो. याचे आता घाट घातला, जाचक तीन कृषी कायद्यांचा. यामध्ये मागील 8 महिन्यांपासून दिल्लीत शेतकरी कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र सरकार या आंदोलनाची काहीही दखल घेत नाही. यावर अण्णांनी बोलायला हवं. या कायद्यांसंदर्भाती त्यांची भूमिका अनाकलणीय असल्याचं विकास देशपांडे यांनी म्हटलं.
दुसरीकडे दुर्गा भोर यांनी विद्यार्थ्यांच्या आणि महिला बेरोजगारीकडे लक्ष वेधत अण्णांनी या संदर्भातही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावं, अशी विनंती केली.