महाराष्ट्रातील जेष्ठ साहित्यिक, नाटककार पुरोगामी चळवळीतील खंदे कार्यकर्ते राजाभाऊ शिरगुप्पे यांचे आज कोल्हापूर येथे निधन झाले आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी राजाभाऊंनी अखेरचा श्वास घेतला. पुरोगामी चळवळीतील एक कार्यकर्ता लेखक अशी दुहेरी भूमिका त्यांनी निभावली होती. त्यांनी साधना साप्ताहिकामध्ये विपुल लेखन केले होते. कथा, कविता, पथनाट्य, समीक्षा, चित्रपट या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या लेखनाची वेगळी ओळख निर्माण केली होती. सांगली येथे झालेल्या १० व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
न पेटलेले दिवे, महाबोधी बसवन्ना एक तत्वज्ञान, शोधयात्रा ईशान्य भारताची,शोधयात्रा ग्रामीण महाराष्ट्राची, तिच्या नवऱ्याचे वैकुंठगमन यासह इतर पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीत त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या साहित्य, चळवळ आणि नाट्यक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज सायंकाळी निपाणी-शिरगुप्पी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.