ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांचे निधन

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांचे औरंगाबाद येथे निधन झाले. मनोहर टाकसाळ यांचा संघर्ष आणि त्यांच्या कार्याची माहिती देणारा लख दत्ता कानवटे यांनी मॅक्स महाराष्ट्रवर २०१७ मध्ये लिहिला होता. मनोहर टाकसाळ यांच्या कर्तृत्वाची ओळख करुन देणारा लेख पुनर्प्रकाशित करत आहोत.

Update: 2021-11-30 13:20 GMT

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामात त्यांनी सहभाग घेतला होता. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून गोर गरिबांसाठी त्यांनी मोठं कार्य केलं होते. भाकपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करुन देणारा 14 ऑगस्ट

२०१७ रोजी प्रसिद्ध झालेला लेख….

स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसाळांची संघर्ष कहाणी... साधारण 1940 चा काळ असेल तो... इन मिन चौथीत असलेला एक मुलगा आपल्या हातात तिरंगा घेऊन गावाच्या वेशीवर चढतो आणि तिथे तो मोठ्या दिमाखात फडकवतो... त्याला त्यावेळी पोलीस काय असतात, गुन्हा काय असतो, शिक्षा काय असते यातलं काहीच माहीत नसतं त्याला माहित असतं ते फक्त पारतंत्र्यात असलेल्या देशाचं स्वातंत्र्य, इंग्रज आणि निजामाच्या फौजा हातात बंदुका घेऊन स्वातंत्र्यचा आवाज चिरडायला तयार असलेल्या दिवसात वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी गावाच्या वेशीवर तिरंगा फडकवणाऱ्या त्या चिमुरड्याचं नाव आहे कॉम्रेड मनोहर टाकसाळ...

ही घटना आहे त्यावेळच्या निजाम राजवटीतली, अत्यंत दुर्गम असलेल्या बीड जिल्ह्यातील नवगन राजुरी या गावातली. स्वातंत्र्याला आता 70 वर्षे उलटलीत, 10 व्या वर्षी गावाच्या वेशीवर झेंडा फडकवणारा तो चिमुरडा आता 87 वर्षांचा महावृक्ष झालाय... रापलेला चेहरा, थकलेले डोळे, लांबलेले जुनाट केस, अंगावर आजही साधेच कपडे, वयोमानानुसार मंदावलेली चाल ही ओळख आहे आजच्या मनोहर टाकसाळ यांची... पण आजही बुद्धीवर प्रचंड तेज तर आहेच पण कामाची गती ही त्याच स्वातंत्र्यचळवळीतल्या सैनिकासारखी आहे. खोकडपुऱ्यातल्या पक्षाच्या कार्यालयातून ते आजही कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं काम पाहतात...

"मी अजूनही हरलेलो नाही" हा त्यांचा बाणा त्यांना भेटलं की स्पष्ट जाणवतो. पण आजच्या स्वातंत्र्यावर मात्र ते फारसे खुश नाहीत. बोलायला सुरुवात झाली की त्यांचे सवाल सुरू होतात. रोज अल्पसंख्यांकांच्या हत्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे स्वतंत्र असतं का ? गरीब विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी वणवण आणि गल्लाभरू लोकांची चंगळ हे स्वतंत्र असतं का..? असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या समोर आहेत आणि म्हणून आज वयाच्या 87 व्या वर्षीही ते सामाजिक चळवळीत सक्रिय सहभागी असतात. निदर्शने मोर्चे आंदोलने अश्या अनेक ठिकाणी स्वतः मनोहर टाकसाळ हे जातीने उपस्थित असतात...

त्यांची स्वतंत्र्य चळवळीतली कहाणी ही तितकीच अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे. हजारो पुस्तकं आणि लाखो कागदांनी गच्च भरलेल्या त्यांच्या घरातल्याच कार्यालयातून ते स्वातंत्र्यसंग्रामतली त्यांची कहाणी सांगू लागतात... ते सांगतात की, "मला स्वातंत्र्य चळवळीची खरी ओढ लावली ती खिराजी नावाच्या एक शेतमजुराने, खिराजी हा अनपड असला तरी त्याला गाणे म्हणायचा खूप शोक होता... त्यावेळी मी आईने घेऊन दिलेली शेळी राखायचो.. तेंव्हा मला शेतात रानावनात हा खिराजी भेटायचं... तो गाणे म्हणायचा मी माघे म्हणायचो... देशभक्तीची, स्वातंत्र्याची, इंग्रज विरोधी हळूहळू या गाण्यांना सामाजिक चळवळीचं स्वरूप यायला लागलं... आम्ही गावात हे गाणे सार्वजनिक ठिकाणी म्हणायला लागलो... त्यावेळी आमच्या शाळा या निझाम राजवटीतल्या होत्या शाळेत उर्दू भाषेतली अवघड प्रार्थना म्हणावी लागायची... पण ती काही मला जमायची नाही... मात्र हे स्वातंत्र्याचे गाणे मी ओघवत्या शैलीत गायचो... याचाच राग मनात धरून एका मुस्लिम निझाम समर्थकाने माझ्या आज्जीलाही मारहाण केली, याचाही राग मनात बसलाच...

स्वातंत्र्य चळवळीने पेट घेतला आणि खिराजीने गावाच्या वेशीवर तिरंगा फडकवण्याचा निर्णय घेतला. तो झेंडा वेशीवर फडकवण्याची जबाबदारी माझी होती. मी क्षणाचाही विचार न करता त्या वेशीवर चढलो भारताचा स्वतंत्र प्रतीक तिरंगा वेशीवर फडकवला... पुढे त्याचे परिणाम व्हायचे ते झाले. खिराजीला अटक झाली मी लहान असल्यामुळे मला दमदाटी करून पळवलं. गावातल्या लोकांनीही मला लपवून ठेवलं... नंतर अशी विरोधी कृत्य करायची नाहीत या अटीवर खिराजीची सुटका झाली पण आम्ही शांत बसणार ते कसले..." पुढे परिसरातले अनेक स्वातंत्र्यसैनिक आमच्या गावात येऊ लागले. सभा बैठका होऊ लागल्या... चळवळीला जोर आला. गाव स्वातंत्र्य संग्रामाचं केंद्रबिंदू होतंय, हे लक्षात आल्यानंतर इंग्रजप्रणित निजामांची फौज गावात आली. गावशेजारी असलेल्या डोंगरी नदीच्या पलीकडे आंबराईत त्यांचा तळ पडला. स्वातंत्र्य सैनिकांवर वचक बसली... त्यामुळे माझ्यावर गावात चाललेल्या गुप्त खबरा स्वातंत्र्यसैनिकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी आली.

मी फौजेतल्या आणि प्रशासनाच्या खबरा नेत्यांपर्यंत पोचवत असे. दरम्यान गावात देशभक्तीची गाणे सुरूच होते. त्याकाळी इंग्रज आणि निझाम प्रशासनाने या स्वातंत्र्यसैनिकांची आर्थिक नाचक्की करण्याचे प्रयत्न सुरू केले. यावर प्रर्याय काढून पोटभरणे, लागणारा खर्च भागवणे, आणि चळवळ सुरू ठेवणे गरजेचे होते. यासाठी त्यावेळी स्वातंत्र्य सैनिकांनी रात्री अपरात्री चंदन तोडून विकण्याची शक्कल लढवली. आज जरी ती गोष्ट चुकीची असली तरी त्याकाळची ती गरज होती. सैनिकांना मदत म्हणून त्या लहान वयातही आम्ही रात्री अपरात्री चंदन तोडायला जात असू. तोडलेलं चंदन जंगलात डोंगरात लपवून ठेवायचो. मी लहान असल्यामुळे माझ्यावर कुणी शंका घेणार नाही या भावनेने मला ते सांभाळायला ठेवले जाई... अशा कित्येक रात्री मी त्या काळी जागून काढल्यात. देशासाठी त्या लहान वयात जे जमेल ते केलं, झेंडा फडकवला, गाणे म्हटले, खबरा पोचवल्या, चंदन तोडले-सांभाळले, भूमिगत सैनिकांना भाकरी पोचवल्या. अशी अनेक कामे केली. पोटात कितीही भूक लागली तरी सैनिकांसाठी आणलेल्या भाकरीतला तुकडाही आम्ही लहान असूनही तोंडात घालायचो नाही. पण आज मात्र सत्तेत बसलेले लोक आपल्या हाताखाली असलेल्या तिजोरीवर कसा येथेच्छ हात मारतात, लाखो करोडोंचे घोटाळे होतात तेव्हा ते लहानपणातले उपाशी पोटी स्वातंत्र्यात काम केलेले दिवस आठवले की खूप वाईट वाटतं.

" कॉम्रेड मनोहर टाकसाळ हे सगळं सांगत असताना त्यांच्या मनातली देशाप्रतिची संवेदना आणि गैरव्यवहाराबाबतचा संताप जाणवत होता... स्वातंत्र्य संग्रामात अतुलनीय काम केलेल्या मनोहर टाकसाळ यांनी नंतर कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं, आणि आयुष्यभर कुठलीही नोकरी न करता समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. संपत्ती जमवणे, भरमसाठ पैसे कमावणे या गोष्टी त्यांच्यासाठी कायम निषिद्ध होत्या. त्या आजही आहेत. वकालतीच्या काळात त्यांनी आयुष्यभर गोरगरीब आडल्या नडलेल्याच्या केसेस लढवल्या फिस कधीही कुणाला मागितली नाही. एका हत्येच्या गुन्ह्यात अडकलेल्या भल्या माणसाची केस त्यांनी लढवली. ती जिंकली सुध्दा, त्यानंतर तो व्यक्ती स्वतःची शेती विकून फिस द्यायला तयार झाला... पण त्याला शेती विकू दिली नाही. शेतीत जे काही चार दाणे पिकतील त्यातले दोन दाणे मला देत जा असं सांगितलं. पण त्याची परिस्थिती नाजूक होती... नंतर त्यांनी तेही घेतलं नाही. आजही मनोहर टाकसाळ बसने फिरतात, मोबाईल साधाच वापरतात, पुस्तकांचा प्रचंड छंद आहे. सामाजिक चळवळीत सतत सक्रिय असतात. सध्याच्या बिघडलेल्या परिस्थितीत कमिशन बहाद्दर वकिलांच्या काळात, बेसुमार भ्रष्टाचाराच्या मगजमारीत स्थितप्रज्ञ मनोहर टाकसाळ हे दीपस्तंभ आहेत. असा निष्ठावंत स्वातंत्र्यसैनिक पुन्हा होणे नाही...

Tags:    

Similar News