महाड : राज्यासह देशभरात हाहाकार माजवणाऱ्या तळीये दुर्घटनेतील मृतांची संख्या ८४ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच इथले शोधकार्य आता थांबवण्यात आले आहे. बेपत्ता ३१ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गाव २२ जुलैला अतिवृष्टीमुळे दरड कोसळून उद्ध्वस्त झाले होते. रविवारपर्यंत इथे ढिगार्याजतून ५३ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मात्र सोमवारी चौथ्या दिवशी बचावकार्य थांबविण्यात आले आहे. बेपत्ता असलेल्या ३१ जणांना मृत घोषित करण्यात आलं असुन तळीये दुर्घटनेतील मृतांचा संख्या आता ८४ झाली आहे.
या घटनेनंतर ढिगाऱ्याखालून केवळ ५ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आह, हे ५ जण जखमी अवस्थेत सापडले आहेत. बेपत्ता असलेल्या ३१ जणांचा शोध गेले तीन दिवस युध्दपातळीवर सुरु होता. या ढिगाऱ्याखालून आता कोणी जिवंत आढळेल, ही आशा मावळल्याने अखेर हे बचावकार्य थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यावेळी या गावातील लोकांचे नातेवाईक उपस्थित होते, शोधकार्य थांबविण्यात आल्याचे जाहीर केल्यानंतर या लोकांच्या अश्रूंचा बांध फुटला.
तळीये गावावर गुरुवारी (२२ जुलै) दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. घरंच्या घरं दरडीखाली दबली जाऊन निष्पांपाचे जीव गेले. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या तळीयेमध्ये आता फक्त उद्ध्वस्त झालेले संसार, चिखल, आणि आक्रोश सुरु आहे. दरडग्रस्त तळीये गावाची आधी मुख्यमंत्री व नंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली होती. यानंतर राज्य सरकार माळीणच्या धर्तीवर तळीयेचं पुनर्वसन करणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तर केंद्र सरकारकडून पंतप्रधान आवास योजने अंतर्गत तळीये गावाचं पुनर्वसव करणार असल्याचं आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गावकऱ्यांना दिले आहे.