जयगड बंदरानजिक बेपत्ता झालेली बोट व माणसांचा पुन्हा शोध घ्यावा - मंत्री उदय सामंत

Update: 2021-11-09 13:10 GMT

रत्नागिरी // जयगड बंदरानजिक बेपत्ता झालेली बोट आणि त्यातील माणसे यांचा पुन्हा शोध घेऊन या प्रकरणातील सत्य समोर आणा असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिले. याबाबत बोलावलेल्या बैठकीत आज जिल्हाधिकारी कार्यालय समिती कक्षात त्यांनी स्थानिकांकडून माहिती जाणून घेतली आणि अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील तसेच पोलीस दल आणि कोस्ट गार्ड तसेच मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लगतच्या गावातील मच्छीमारांनी सदर बोट जिंदाल कंपनीच्या मोठ्या जहाजामुळे बुडाल्याची तक्रार केली आहे. मात्र बोटीचे कोणतेही अवशेष आणि त्यावरील खलाशांचे मृतदेह अद्याप हाती लागलेले नाहीत. सदर घटना 26 ऑक्टोबरच्या रात्री घडली होती. बोट भरकटली असावी असे समजून या बोटीच्या मालकाने प्रारंभी शोघ घेण्याचा प्रयत्न केला.मात्र अपयश आल्याने 72 तासांनी यात पोलिसात तक्रार करण्यात आली.

पोलिस आणि कोस्टगार्ड आपापल्या पध्दतीने यासाठी शोधमोहिम राबविली मात्र अद्यापही यात काहीच सापडलेले नाही. याबाबत नव्याने शोधमोहिम राबवावी तसेच यात अपहरणाचा प्रकार तर नाही ना याचाही तपास करण्याचे निर्देश सामंत यांनी दिले.

Tags:    

Similar News