कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बंद असलेल्या शाळांचे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. पण मुंबईतल्या कुठल्याच शाळा 31 डिसेंबर पर्यंत सुरू होणार नाहीत, असा निर्णय़ मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी घेतला आहे. शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोषी यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही मॅक्स महाऱाष्ट्रशी बोलताना ही माहिती दिली आहे. तसंच राज्यभरात त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
अनलॉक अंतर्गत अनेक व्यवहार खुले करण्यात आले आहेत तसंच आता प्रार्थना स्थळंही खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.