वाशिम जिल्ह्यात 'एक' विद्यार्थ्याची शाळा
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील गणेशपूर या गावात आज ही एक शाळा, एक विद्यार्थी आणि एकच शिक्षक असलेली जिल्हा परिषदेची शाळा अस्तित्वात आहे.
इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांचे वाढते प्रमाण पाहता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळांमध्ये पटसंख्येचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तरी वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील गणेशपूर या गावात आजही एक शाळा, एक विद्यार्थी आणि एकच शिक्षक असलेली जिल्हा परिषदेची शाळा अस्तित्वात आहे. गणेशपूरच्या या शाळेमध्ये कार्तिक शेगोकार हा एकच विद्यार्थी शिक्षण घेत असून, एकच शिक्षक या शाळेत ज्ञानदानाचे काम करत आहेत. शासन जरी जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी उदासीनतेचे धोरण दाखवीत असले तरी आज ही काही ग्रामीण भागामध्ये अशा शाळा सुरू आहेत.
एक जरी विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असला तरी त्याला शिकवण्यात मला कुठला ही संकोच वाटत नसल्याचे या शाळेतील शिक्षक किशोर मानकर हे सांगतात. गणेशपूरच्या या जिल्हा परिषदेच्या शाळेचा आदर्श घेवून, आता तरी शासनाने जिल्हा परिषदेच्या गाव खेड्यातल्या शाळांचा दर्जा सुधारला तर नक्कीच अशा शाळांना चांगले दिवस येण्यास वेळ लागणार नाही.