राज्यभरात आठवी ते बारावीच्या शाळा आता सुरू झाल्या आहेत. तब्बल दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी आणि पालक आनंदात आहेत. पण आता शाळा सुरू होताच शाळांनी थकीत फी मागण्यास सुरूवात केली आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन गरिब विद्यार्थ्यांच्या फी चा भार उचलला आहे.
लॉकडाऊनमुळे नोकऱ्या गेलेल्य़ा पालकांना दीड वर्ष पी न भरण्याची सवलत शाळांनी दिली. पण आता शाळा सुरू होताच पहिल्या दिवसापासूनच शाळा प्रशासनाने फी भरण्याचे आवाहन केले आहे. पण रोजगार गेला आहे किंवा कमी झाला आहे, त्यामुळे आपल्या पाल्याची फी भरायची कशी या चिंतेने हे पालक वणवण फिरत आहेत. डोंबिवली मधल्या अशाच काही पालकांना सुधाश्री सेवाभावी संस्थेने मदत केली आहे.
या संस्थेने वीस गरीब विद्यार्थ्यांची शाळेची दोन वर्षाची फी भरण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी डोंबिवली येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रामचंद्रनगर शाळेत शिक्षण घेणाऱ्या पाच विद्यार्थ्यांच्या फीचा चेक संस्थेकडे सुपूर्द केला आहे. पण सरकारने व इतर संस्थांनी अशा गरीब व गरजू मुलांसाठी सवलत द्यावी अशी मागणीही आता पालकांनी केली आहे.