सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पंतप्रधान मोदींवर स्तुती सुमनं
सुप्रीम कोर्टावर सत्ताधाऱ्यांच्या जवळीकीचा आरोप वारंवार होत असतो. याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशांनी जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मोदींवर स्तुती सुमनं उधळली आहेत.;
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय, सक्षम आणि दूरदृष्टी असलेले नेते आहेत, अशी स्तुतीसुमनं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम.आर.शाह यांनी उधळली आहेत. गुजरात हायकोर्टाच्या हिरक महोत्सवानिमित्त एका टपाल तिकीटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्चुअल कार्यक्रमात उद्घाटन करण्यात आले, त्या कार्यक्रमात शाह बोलत होते. "या कार्यक्रमाला मला बोलावण्यात आले याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो, कारण गुजरात हायकोर्टाला ६० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त टपाल तिकीटाचे उद्घाटन सर्वाधिक लोकप्रिय, सक्षम आणि दूरदृष्टी असलेल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे, याचा मला अभिमान आहे," असे सांगत त्यांनी भाषणाची सुरूवात केली.
गुजरात हायकोर्ट आपली कर्मभूमी असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी सत्तेच्या विक्रेंद्रीकरणाच्या घटनात्मक संकल्पनेचे म्हणजे न्यायपालिका, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळाचे महत्त्व समजावून सांगितले. "या तिन्ही यंत्रणांनी आपापल्या कक्षेत राहून आपली कर्तव्ये पार पाडायची असतात आणि मला अभिमान आहे की, गुजरात हायकोर्टाने आपले कर्तव्य उत्तम पद्धतीने पार पाडले आणि आपली लक्ष्मणरेषा कधीही पार केली नाही." त्यांनी पुढे सांगितले की, "मला हे सांगताना अतिशय अभिमान वाटतोय की, गुजरात हायकोर्टाने, ज्यामध्ये आपण २२ वर्षे वकील म्हणून काम केले आणि १४ वर्षे न्यायाधीश म्हणून काम केले, आणीबाणीच्या काळातही अविरतपणे नागरिकांचे मुलभूत अधिकार जपण्याचे काम केले आहे. देशातील पहिली लोक अदालत गुजरात हायकोर्टाने भरवली होती. तसेच हायकोर्टातील सुनावणीचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि व्हर्च्युअल सुनावणी यु ट्यूबवर दाखवणारेही गुजरात हायकोर्ट देशातील एकमेव कोर्ट आहे. आज न्याययंत्रणा हे सत्य आणि आशाआकांक्षांची मशाल घेऊन उभी आहे" असेही त्यांनी सांगितले.
२०१८मध्ये पटना हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली तेव्हाही पत्रकार परिषदेत न्या. शाह यांनी पंतप्रधान मोदी यांना मॉडेल आणि हिरो म्हणून संबोधले होते. गेल्यावर्षी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनीही एका जाहीर कार्यक्रमात "पंतप्रधान नरेंद्र मोदी थिंक्स ग्लोबली अँड एक्ट्स लोकली" असे वक्तव्य केले होते. यावर सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनने न्यायमूर्ती मिश्रा यांचे वक्तव्य स्वतंत्र न्याय व्यवस्थेला न शोभणारे असल्याने त्यांच्या निषेधाचा ठराव केला होता. गुजरात हायकोर्टाच्या कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाप्रती कटिबद्ध असल्याने ते लोकप्रिय आहेत, असे वक्तव्य गुजरात हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी केले. या कार्यक्रमात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशातील न्यायालयांनी कोरोना संकटाच्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन काम सुरू ठेवले हे अभिमानास्पद आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिद्वारे सर्वाधिक सुनावणी घेणारे सुप्रीम कोर्ट हे जगातील पहिले कोर्ट ठरले आहे. यावेळी पंतप्रधानांनी न्याययंत्रणेत आर्टिफिशियल इंटेलीजन्सच्या वापराचेही सुतोवाच केले.