सुप्रीम कोर्टाने खडसावल्याने SBI कडून निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांची माहिती सुपूर्द
काल मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने भारतीय स्टेट बँकेला मंगळवारी सायंकाळपर्यंत निवडणूक रोख्यांचे तपशील निवडणूक आयोगाला पाठवा अशी सुचना देत खडसावल्यानंतर आज भारतीय स्टेट बँक (SBI) ने तातडीने निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला सुपूर्द केली आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही माहिती एस.बी.आय. ने निवडणूक आयोगाला दिली असल्याचं सांगितलं जात आहे. एस.बी.आय. कडून दिल्या गेलेल्या माहितीतून नेमकी काय माहिती समोर येणार आहे? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष एकवटलेलं आहे.
भारतीय स्टेट बँकेने या निवडणूक रोख्यांचा तपशील सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे ३० जूनपर्यंतची मुदतवाढ करण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने भारतीय स्टेट बँकेला १२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा तपशील सादर करावा आणि आयोगाने १५ मार्चला सायंकाळी ५ वाजेपर्यंत संकेतस्थळावर हा तपशील प्रसिध्द करावा असं सांगितलं. त्याचबरोबर मागच्या २६ दिवसांत तुम्ही काय केलं? अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने एस.बी.आय. ला काल झालेल्या सुनावणीदरम्यान धारेवर धरत सुनावलं होतं.
सुप्रीम कोर्टाने SBI ला दिला खड्या शब्दात दम
निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांसंदर्भात जी माहिती सादर करायची आहे, ती भारतीय स्टेट बँकेकडे सहज उपलब्ध आहे. निवडणूक रोख्यांसंबंधीची माहिती तंतोतंत जुळालीच पाहिजे, असं आम्ही सांगितलं नव्हतं. दिलेल्या आदेशाची तुम्ही अंमलबजावणी करा. तुम्हाला फक्त सीलबंद असलेली माहिती निवडणूक आयोगाकडे पाठवायची आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशाचे मुदतीत पालन न केल्यास हा कोर्टाचा जाणीवपूर्वक केलेला अवमान समजून कारवाई केली जाईल, अशा खड्या शब्दात कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला दम दिला होता.