सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाचा लढा अजूनही अपूर्णच : भगवान केशभट
महिलांना शिक्षण ही गोष्टच समाजामध्ये नव्हती अशा काळामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाची सुरुवात करून देशात एका नवीन क्रांती घडवायला सुरुवात केली. परंतू आज देशातील बहुसंख्य कष्टकरी बहुजन दलित आदिवासी समाजातील मुली खूप मोठ्या प्रमाणात शिक्षणापासून वंचित राहतात त्यांना अजूनही शिक्षण मिळत नाही त्यामुळे सावित्रीबाईनी सुरु केलेला शिक्षण क्रांतीच्या चळवळीचा लढा अपूर्ण असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते व वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केशभट यांनी व्यक्त केली.
महान समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी डक्सलेजीस या विधी सल्लागार संस्थेने खारघर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि शंखनाद वाहिनीचे संपादक सुनील कुहीकर, डक्सलेजीसचे
व्यवस्थापकीय संचालक दिव्येंदु वर्मा, नाट्य कलावंत अश्विनी हडपे,ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार,ऍड. अरुण सुरवाडे, नवी मुंबईतील क्रीडा संघटक बंडू खडगी, कारभारी वाघमारे, वैशाली चुंचूवार,आदी उपस्थित होते.
"आज राजस्थान,हरियाणा आणि महाराष्ट्रात देखील दलित आदिवासी, ग्रामीण भागांमध्ये विद्यार्थी पटसंख्या कमी झाल्यास सरकारी शाळा बंद केल्या जातात. त्यामुळे दलित, कष्टकरी समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहत असून या माध्यमातून लाखो मुलींना शाळांतून हद्दपार करण्याचे कारस्थान सुरू आहे. दुसरीकडे श्रीमंत वर्गासाठी विशिष्ट प्रकारच्या शाळा आणि शिक्षण दिले जात असून एक वेगळा वर्ग देशात तयार करण्यात आला आहे. कष्टकरी बहुजन समाज शिक्षणापासून वंचित कसा राहिल यासाठीची धोरणे राबवली जात आहेत. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी निर्माण केलेला हा लढा अद्यापही अपूर्ण असून त्यासाठी सर्वांनी पुन्हा एकदा लढण्याची गरज आहे, " असे आवाहन केशभट यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर यांनी सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या चळवळीच्या संदर्भात आपण किती यशस्वी झालो, यासाठी सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. "ब्राह्मण समाजातील महिलांच्या विरोधातील केशवपन सारख्या कूपप्रथा बंद करण्यासाठी महात्मा फुले यांनी देशात पहिला न्हाव्याचा संप घडवून आणला होता. हा संप केवळ ब्राह्मण समाजातील स्त्रियांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या अधिकारांचा संप होता त्यामुळे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या महापुरुषांचे कार्य हे समाज परिवर्तनाचे होते. त्यामुळे फुले दांपत्य हे केवळ एका विशिष्ट जातीच्या कल्याणासाठी नव्हे तर संपूर्ण समाजाच्या हितासाठी लढले. मात्र आज आपण सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या विचारानुसार वागतोय का ? आपल्या घरात काम करणारी मोलकरीण असो की कार्यालयात काम करणारे शिपाई यांच्याशी आपण कसे वागतो ? या बाबत आपण आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे," असे कुहीकर म्हणाले.
साक्षात सावित्रीबाई अवतरते तेव्हा !
या कार्यक्रमातील एक अतिथी आणि नाट्य कलावंत अश्विनी हडपे या कार्यक्रम स्थळी थेट सावित्रीबाईच्या रूपात अवतरल्या आणि सुमारे 20 मिनिटे सावित्रीबाई बनून त्यांनी सादर केलेला एकपात्री प्रयोग उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेला. " माझ्या काळात आणि आजच्या काळात महिलांच्या स्थितीत काय फरक पडला नाही! तेव्हा मला शेण दगड धोंडे मारले जायचे आज मुलींना ट्रोल केलं जात आहे," या त्यांच्या वाक्यांनी उपस्थितांची मने हेलावली. जातीपातीच्या भिंती तोडा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.