सत्यपाल महाराजांनी केला चुलीवरच्या बाबाचा भांडाफोड
गेल्या काही दिवसांपुर्वी पेटलेल्या चुलीवर ठेवलेल्या तव्यावर बसलेला बाबा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच अशा प्रकारे समाजात अंधश्रध्दा पसरवण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे सत्यपाल महाराज यांनी चुलीवर बसून त्यामागचं कारण सांगितलं आहे.;
गेल्या काही दिवसांपुर्वी चुलीवर बसलेल्या आणि अश्लील शिव्या देणाऱ्या एका बुवाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत एक बाबा चुलीवर ठेवलेल्या तव्यावर बसला होता. त्यामुळे या बाबाला दैवी चमत्कार येत असल्याचा दावा केला जात होता. मात्र या चमत्काराचा दावा करणाऱ्या बाबाची सत्यपाल महाराजांनी पोलखोल केली आहे. यावेळी सत्यपाल महाराज म्हणाले, चुलीवर तवा ठेऊन त्यावर बसताना अंतर्वस्त्रासह ओले कपडे घालून बसल्यास आणि त्याबरोबरच तव्यावर ओला काळा कपडा ठेवल्यास चव्याचे चटके बसत नाहीत. अशा प्रकारे आपण पाच मिनिटं तापत्या तव्यावर बसू शकतो. मात्र त्यानंतर हळुहळू चटके लागायला सुरुवात होते. त्यामुळेच त्या व्हिडीओतील बुवाने शिव्या द्यायला सुरुवात केली, असं सत्यपाल महाराज म्हणाले.
पुढे सत्यपाल महाराज म्हणाले, अशा प्रकारे कुठलाही बाबा किंवा बुवा दैवी चमत्काराचा दावा करत असेल तर ते साफ चुकीचे आहे. त्यामुळेच त्या बुवाचा भांडाफोड करण्यासाठी मी तापलेल्या तव्यावर बसलो असल्याचेही सत्यपाल महाराज यांनी सांगितले. तसेच लोकहो बाबा बुवांना भुलू नका, असंही सत्यपाल महाराज यावेळी म्हणाले.