'सामना'तून संजय राऊत यांचा गौप्यस्फोट काका-पुतण्यांच्या भेटीचं नवं कारण आलं समोर
राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेटीगाठीची वाढल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतरही पवार काका-पुतण्यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवार यांच्या भाजपसोबतच्या हातमिळवणी मागे शरद पवार यांचीच खेळी असल्याचंही चर्चा सर्वत्र रंगत आहेत. मात्र, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पवार काका-पुतण्यांची भेटीमागचं नवं कारण समोर आणलं आहे. त्यामुळे राजकाणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील रोखठोकमधून हे विधान केलं आहे. शरद पवार आणि अजित पवार यांची भेट राजकीय नसेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी अनेक संस्था उभारल्या आहेत. शिक्षण, सहकार, कृषी क्षेत्रातील या संस्था आहेत. त्या संस्थांवर शरद पवार यांनी अजितदादांना घेतलं आहे. त्यामुळे आता त्या संस्थांचं पुढे काय करायचं यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. शरद पवार यांच्या हयातीतच अजितदादांनी त्यांच्या पक्षांवर दावा सांगितला. तिथे या संस्थांचे काय? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
अजित पवार हे आजच्या घडीला राजकारणातील बडे नेते आहेत. पण सत्तेची गदा आणि शरद पवार यांचे नाव नसेल तर अजित पवार कोण? असा प्रश्न महाराष्ट्राला पडेल, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. शरद पवार यांनीच अजितदादांना राजकारणात आणलं आणि त्यांना यशाच्या शिखरावर नेवून ठेवलं. पण अजितदादांनी पवारांना त्याच शिखरावरून ढकलण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.