Journalist Shashikant Warishe Death : संजय राऊतांना धमकी... म्हणाले "तुमचाही शशिकांत करू"

Update: 2023-02-11 08:41 GMT

रत्नागिरी जिल्ह्यात पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा मुद्दा (Journalist Shashikant Warishe Murder) गाजत असतांनाच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना धमकीचे फोन आले आहेत. यासंदर्भात राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले आहे.

नाणार इथल्या नियोजित रिफायनरीला (Nanar Refinery) विरोध करणा-या पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा मुद्दा उचलाल तर तुमचाही शशिकांत वारीशे करू, अशी धमकीच संजय राऊत यांना फोनद्वारे मिळाल्याचं, स्वतः राऊत यांनीच सांगितलं. वारीशे कुटुंबियांना भेटायलाही न जाण्याची ताकीद राऊत यांना फोनद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकऱणाची चौकशी करण्याची मागणीच आता खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा विषय उचलू नका म्हणून मला धमकी आली आहे. मला सतत फोनही येत आहेत. मात्र, मी या धमक्यांना घाबरत नाही, मी जाहीरपणे हा विषय हाती घेतला आहे, मी कोकणात जाणारच असल्याचं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. वारीशे यांच्या हत्येवरून सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या हत्येच्या मुद्द्यावरून राऊत यांनी सरकारलाच संशयाच्या भोव-यात आणलंय.

"रिफायनरीला स्थानिक रहिवाशांचा विरोध आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. मात्र, जेव्हापासून महाराष्ट्रात सत्तांतर झालंय. या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री स्थानिकांना धमकावत आहेत की, कुठल्याही परिस्थितीत आम्ही इथं रिफायनरी आणणारचं. याला विरोध कराल तर तो विरोध आम्ही मोडून काढू" अशा प्रकारच्या धमक्या जर सरकारकडून दिल्या जात असतील तर त्या ठिकाणच्या गुंडांना बळ मिळेल, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली. 15 दिवसांपूर्वीच आंगणेवाडी (Anganewadi) इथं देवीची यात्री झाली. मुंबईतून हजारो लोकं या यात्रेला जातात. त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेतली होती. त्या सभेत उपमुख्यमंत्र्यांनी विधान केलं होतं की," रिफायनरी आम्ही घेऊन येऊ कोण रोखतंय ते पाहू" . त्यांच्या या विधानानंतर 24 दिवसांनी रिफायनरीला विरोध करणारे युवा पत्रकार शशिकांत वारीशे यांची निर्घुण हत्या झाली. याचा अर्थ काय आहे ? हा केवळ एक योगायोग नाहीये. या हत्येमागे मोठा कट आहे. मी काय बोलतोय हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना चांगलच माहिती आहे. आजवर कोकणात 25 वर्षात जेवढ्या हत्या झाल्या आहेत, त्यात या घटनेचाही समावेश असल्याचं राऊत म्हणाले.  

Tags:    

Similar News