भाजपामध्ये औरंगाबादचे नामांतर करण्याची हिंमत नाही - संजय राऊत
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असून सुद्धाऔरंगाबादचे नामांतर करण्याची त्यांच्यात हिंमत नसल्याची टिका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच भाजपचे लोक ढोंगी असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.;
राज्यात अनेक दिवासांपासून विविध मुद्यावरुन राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामध्येच अनेक नेते गौप्यस्फोट करुन खळबळ उडवून देत आहेत. यातच आता नामांतराचा मुद्दा पुढे आला आहे. उस्मानाबाद शहराचे धाराशीव नामकरण करण्यास केंद्र सरकारने ना हरकत पत्र दिले असून, औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. यावरुन आता ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तोंडसुख घेतले आहे. त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
नामांतर करण्यावरुन राजकारण सुरु असताना भाजपाचे नेते नेमके कोणाला घाबरतात. यावर निर्णय न घ्यायला कोणाता कायदा आडवा येतो. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे राज्य आहे. मग नेमकी अडचण काय आहे? असे अनेक प्रश्न संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना विचारले आहेत. मूळात भाजपाचे लोक ढोंगी आहेत. त्यांनी अलाहाबादचे नामांतर केले. मात्र औरंगाबादचे नामांतर करण्याची त्यांच्यात हिंमत नाही, या शब्दात संजय राऊत यांनी भाजपावर कडाडून टिका केली.
महाविकासा आघाडीचे सरकार असताना हेच भाजपाचे नेते हिंमत असेल तर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करुन दाखवा असा रोज गळा काढून ओरडत होते. त्यानेळी उद्धव ठाकरेंनी हे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता हा प्रस्ताव केंद्र सरकारने रखडून ठेवला आहे. याचे कारण काय? औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याची निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारने घेतला. मात्र भाजपा आता त्यावर भूमिका घ्यायला तयार नाही, असे सांगत संजय राऊत यांनी भाजपावर टिका केली आहे.