संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनाची खिल्ली उडवत मागच्या काही काळात आंदोलनजिवी पाहायला मिळत असल्याचे म्हटले होते. त्यावर, शिवसेना नेते .खा संजय राऊत यांनी ट्विट करून 'होय, आम्ही आंदोलनजिवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असं म्हणत मोदींवर पलटवार केला आहे.
शिवसेना आणि भाजपा दरम्यान रोजच्या रोज वाकयुद्ध सुरू असून भारतीय जनता पार्टीच्या आरोपांना संजय राऊत सडेतोड उत्तरं देत आहेत. दोनच दिवसा पूर्वी महाराष्ट्र दौर्यावर असलेले गृहमंत्री अमित शहा यांनाही राऊत यांनी फटकारले होते.
'होय, आम्ही आंदोलनजिवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे', 'जय जवान, जय किसान' आणि 'गर्वसे कहो हम आंदोलनजिवी है', 'जय जवान, जय किसान', असे दोन ट्विट संजय राऊत यांनी केले आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना राऊत यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला भेट दिली होती. येथे त्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान राकेश टिकैत यांच्याबरोबर काढलेला फोटो देखील राऊत यांनी ट्विट केला आहे.
राष्ट्रपतींचे अभिभाषणावर राज्यसभेत झालेला प्रदीर्घ चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्यावर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, 'काही बुद्धिजिवी असतात, काही श्रमजिवी असतात, परंतु मागच्या काही काळात आंदोलनजिवी पाहायला मिळत आहेत. देशात कुठेही काहीही झाले, तर हे आंदोलनजिवी सर्वात आधी तिथे असतात. कधी पडद्याच्या मागे असतात, तर पडद्या पुढे असतात. अशा लोकांना ओळखून आपल्याला त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. हे लोक स्वत: आंदोलन करत नाहीत. त्यांची ती क्षमताही नाही. मात्र, एखादे आंदोलन सुरू असेल, तर हे लोक तिथे पोहोचतात. हे आंदोलनजिवी परजिवी आहेत. ते प्रत्येक ठिकाणी मिळतात, असे मोदी म्हणाले होते.
पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरुन भारतीय जनता पार्टीने मगील काळात ठिकठिकाणी केलेल्या आंदोलनाचे फोटो प्रसिद्ध करत नेटिझन ने मोदी आणि भाजप वरती टीकेची झोड उडवली आहे.