सांगली महापालिका आता अॅक्शन मोडवर आली आहे. महापालिका क्षेत्रातील पाणीपट्टी व घरपट्टीची थकबाकीची वसूली करण्याची मोहिमच हाती घेतली आहे. त्यामुळे अनेकजणांचे धाबे दणाणले आहेत.
सांगली महापालिका हद्दीतील थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिका अॅक्शन मोडवर आली आहे. घरपट्टी थकीत असणाऱ्या बड्या थकबाकीदारांच्या नावांचे बोर्ड आता चौका चौकात झळकले आहेत. थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचे नळ जोडणी या वसूलीदरम्यान तोडली जाणार आहे. २ फेब्रुवारीपासून नळ जोडण्या तोडण्याबरोबर मालमत्ता जप्तीच्या कारवाईला सुद्धा सुरुवात करण्यात आली आहे.
आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील १ लाख घरपट्टी धारकांना जप्तीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर ४० हजार ग्राहकांनी तात्काळ थकबाकी न भरल्यास त्यांची नळ जोडणी तोडण्याच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत. तसेच या वसुलीबाबत कोणत्याही कर्मचाऱ्याने कुचराई केल्यास त्याची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत. तसेच मानधन कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेशही आयुक्त सुनील पवार यांनी दिले आहेत.