बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग केस आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या एनसीबीचे समीर वानखेडे यांची अखेर आज बदली झाली आहे.
मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक (झोनल डायरेक्टर) समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांचा मुंबई एनसीबीमधील कार्यकाळ देखील संपला होता. आता त्यांना डीआरआय (डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) विभागामध्ये त्यांची बदली करण्यात आली. मुंबई एनसीबीच्या झोनल डायरेक्टर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी समीर वानखेडे याच विभागात होते. डीआरआय विभागातूनच त्यांना मुंबई एनसीबीमध्ये आणून झोनल डायरेक्टर करण्यात आले. आता त्यांची पुन्हा डीआरआयमध्ये बदली करण्यात आली आहे. समीर वानखेडेंची ऑगस्ट २०२० मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना आता दिल्ली कार्यालयात रिपोर्ट करण्यास सांगितले आहे.
समीर वानखेडे यांचा मुंबई एनसीबीमधील कार्यकाळ संपला होता. मात्र, त्यांची मुंबई एनसीबीतून बदली करायची की एनसीबीमध्येच मुदतवाढ द्यायची? यामुळे निर्णयाला विलंब झाला. महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. महाराष्ट्र भाजपचा एक मोठा नेता समीर वानखेडे यांच्यासाठी दिल्लीत लॉबिंग करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.
समीर वानखेडे यांना मुंबई एनसीबीमध्ये कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतचा निर्णय लांबणीवर पडत आहे. एक दिवसापूर्वी त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर आज समीर वानखेडे यांच्या बदलीचे वृत्त समोर आले आहे.एनसीबीतील समीर वानखेडे यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२१ ला संपला होता. आणि एनसीबी मुंबईच्या विभागीय संचालकपदी कायम राहण्याबाबत त्यांच्या कार्यकाळ वाढवण्यात आलेला नाही. आता समीर वानखेडे हे दिल्लीतील आडीआरआय कार्यलयाला रिपोर्ट करतील, अशी माहिती एनसीबीकडून देण्यात आली आहे.