दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे सचिन वाझे कनेक्शन? नितेश राणे यांचे ट्विट

राज्यात भाजप विरुध्द शिवसेना सामना रंगला आहे. त्यात आरोप प्रत्यारोपांची फटकेबाजी होत आहे. त्यातच नितेश राणे यांनी एक ट्वीट करून खळबळजनक दावा केला आहे.

Update: 2022-02-22 03:41 GMT

राज्यात भाजप विरुध्द शिवसेना संघर्ष टोकाला गेला आहे. त्यातच दररोजच्या पत्रकार परिषदांमधून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान नारायण राणे यांनी दिशा सलियान आणि सुशांत सिंह राजपुत यांच्या मृत्यूबाबत खळबळजनक आऱोप केले होते. दिशा सलियानचा मृत्यू इमारतीवरून पडून नाही तर तिचा बलात्कार करून खून केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याबरोबरच दिशा सलियानचा मित्र असलेल्या सुशांत सिंह राजपुतने मै किसी को छोडूंगा नही, असे म्हटल्याने त्याचाही खून करण्यात आला होता.तर सुशांत सिंह राजपुतचे मारेकरी मंत्र्याच्या गाडीतून गेले होते, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता. त्यापाठोपाठ नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी ट्वीट करून दिशा सलियानच्या मृत्यूबाबत खळबळजनक दावा केला आहे.

आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, मालवणी पोलिसांची भुमिका पहिल्या दिवसापासूनच संशयास्पद आहे. तर त्यांना आता अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र 8 जूनच्या रात्री दिशा सलियान सोबत असलेला रोहन रॉय पुढे येऊन का बोलत नाही? असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

नितेश राणे यांनी पुढे म्हटले आहे की, दिशा सलियान मृत्यूप्रकरणी मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोग आणि मालवणी पोलिसांना पत्र लिहून अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. त्यावरून 8 जूनच्या रात्री तिथे काही घडलेच नाही, असे दाखवण्यासाठी राज्य सरकार नियोजन करत आहेत. मात्र याचा आनंद आहे की, शेवटी ते स्वतःची कबर खोदत आहेत, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

पुढे नितेश राणे यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, 8 जूनच्या रात्री दिशा सलियानला तिच्या मालाडच्या घरी एका काळ्या मर्सिडीजमधून नेण्यात आले. सचिन वाझेकडे असलेली काळ्या रंगाची मर्सिडीज सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. ही तीच मर्सिडीज आहे का? असा सवाल करत सचिन वाझे याला 9 जून रोजी सेवेत रुजू करण्यात आले. त्यावरून सचिन वाझेचे दिशा सलियान मृत्यूशी काय कनेक्शन आहे? अशी शंका नितेश राणे यांनी उपस्थित केली.

मालवणी पोलिसांनी योग्य तपास न केल्याने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. बरोबर ना? असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. पण आता याच मालवणी पोलिसांना महिला आयोगाने अहवाल देण्यास सांगितला आहे? हे कितपत योग्य आहे? या प्रकरणात नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.

आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांनंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सचिन वाझे कनेक्शन आल्याने महाविकास आघाडी सरकार समोरील अडचणी वाढल्या आहेत.

Tags:    

Similar News