परमबीर सिंगांच्या दबावामुळेच सचिन वाझेची नियुक्ती, पोलीस आयुक्तांचा अहवाल
परमबीर सिंग आणि सचिन वाझेच्या लेटर बॉम्बमुळे सरकारची प्रतिमा मलिन झालेली आहे. पण आता परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांचे खास संबंध असल्याचा दावा करणारा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.;
सचिन वाझे यांनी NIAला पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृहमंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात परमबीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखालीच सचिन वाझे काम करत होता, असे स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर या दोघांच्या घनिष्ठ संबंधांवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या अहवालाबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह मंत्रालयाला दिलेल्या अहवालात परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वाजे काम करत होता हे स्पष्ट केले व त्यांच्या निकटच्या संबंधांवर प्रकाश टाकला आहे. मी पत्रकार परिषदेत जे सांगितले ते नेहमीप्रमाणे सत्य ठरले. भाजपाचा खोटेपणा अखेर उघडकीस येतोच"
अहवालात काय?
या अहवालाननुसार वाझे याचे निलंबन रद्द करून पुन्हा पोलीस दलात घेण्याचा निर्णय तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच घेतला होता. तसेच सिंग यांच्याच दबावामुळे सह आयुक्तांना वाझेची नियुक्ती गुन्हेगार गुप्तवार्ता कक्ष (CIU) या महत्त्वाच्या विभागात करावी लागली. वाझे शिस्तपालन न करता थेट सिंग यांनाच रिपोर्टींग करत असे आणि तसे आदेशच सिंग यांनी दिले होते अशी माहिती पोलीस आयुक्तांनीया अहवालात दिली आहे. वाझे याच्या नियुक्तीसह इतर काही बाबींव माहिती सादर करावी असे आदेश गृहविभागाने आयुक्तांना दिले होते.
API असलेल्या वाझेकडे सीआययूच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यास तेव्हाच्या सह आयुक्तांचा विरोध होता, पण परमबीर सिंग यांनी दबाव टाकून वाझेची नियुक्ती करुन घेतल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. कोणत्याही उच्चस्तरीय बैठकीत तपासासंदर्भात घेतलेले निर्णय किंवा बैठकीतील काय झाले याची माहिती वाझेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत असे. टीआरपी घोटाळा, डीसी कार घोटाळा, अंबानी स्फोटक प्रकरण अशा महत्त्वाच्या प्रकरणांसंदर्भातल्या बैठकांना सिंग यांच्यासह वाझे उपस्थित असायचा असेही या अहवालात म्हटले आहे.