#Ukraine - Russia Ukraine War : पंतप्रधान मोदींचा पुतीन यांना फोन
रशिया आणि युक्रेनमध्ये प्रत्यक्ष युध्दाला सुरूवात झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी फोनवरून संवाद साधला.;
रशिया आणि युक्रेन या दोन देशांत युध्दाला सुरूवात झाल्याने जगाचे टेन्शन वाढले आहे. तर जगाची दोन गटात विभागणी होण्यास सुरूवात झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना फोन केला असल्याची माहिती पीआयबीने दिली आहे.
रशिया युक्रेनमध्ये प्रत्यक्ष युध्दाची घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी केली. त्यानंतर जगाचे दोन गटात विभागणी सुरू झाली. त्यामध्ये अमेरीकेसह नाटो देशांनी पुतीन यांच्या निर्णयावर टीका केली. तर काही देशांनी रशियाच्या निर्णयाचे स्वागत केले. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्याशी फोनवरून संवाद साधला.
यावेळी पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युक्रेनसंदर्भातील घडामोडींची माहिती दिली. रशिया आणि नाटो देशांमध्ये असलेला तणाव फक्त चर्चेच्या माध्यमातूनच सोडवला जाऊ शकतो, असे मत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्याशी बोलताना व्यक्त केले. तसेच मोदी यांनी तातडीने हिंसाचार थांबवून राजनैतिक वाटाघाटी या चर्चेच्या माध्यमातून करण्याचे आवाहन केले. तसेच सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असेही मोदी यांनी म्हटले.
मोदी यांनी पुतीन यांच्याशी बोलताना सांगितले की, युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी आणइ नागरीकांच्या सुरक्षेला देशाकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांना युक्रेनमधून भारतात परत आणण्याला आमचे प्राधान्य असल्याचे मोदी यांनी पुतीन यांना सांगितले.
याबरोबरच मोदी आणि पुतीन यांच्यासह दोन्ही देशांमधील अधिकारी आणि मुत्सद्दी अधिकारी एकमेकांच्या संपर्कात राहतील याची ग्वाही दोन्ही नेत्यांनी दिली. दरम्यान युक्रेनच्या राजदुतांनी भारताकडे मध्यस्थीची मागणी केली होती.
रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरू झाल्यामुळे जग तिसऱ्या महायुध्दाच्या उंबरठ्यावर पोहचले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र भारताने कोणत्याही युध्दात सहभागी न होता एकला चलो रे ची भुमिका भारताने घेतली होती. मात्र चीनने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर टीका केली आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान इम्रान खान यांनी रशियाच्या पाऊलाचे स्वागत केले आहे. त्यामुळे भारत तटस्थ राहणार की या युध्दात सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.