राज्यकर्त्यांकडून वर्षानुवर्षे जनतेला केले जाते एप्रिल फुल, संजय राऊत यांचा टोला
1 एप्रिल रोजी नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात होते. तर हाच दिवस एप्रिल फुल म्हणूनही साजरा केला जातो. मात्र राज्यकर्त्यांकडून वर्षानुवर्षे जनतेला एप्रिल फुल बनवले जात असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला. ते मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते.
एप्रिल महिन्याची सुरूवात एप्रिल फुलने होते. त्यामुळे अनेकदा या दिवशी लोक एकमेकांची फसवणूक करतात. त्याप्रमाणेच राज्यकर्तेही वर्षानुवर्षे जनतेला एप्रिल फुल बनवत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, एप्रिल फुल हा गमतीचा विषय नसून सध्या तो जगण्यामरण्याचा विषय बनला आहे. तसेच पाच राज्यांच्या निवडणूका झाल्या आणि सरकारने एप्रिल फुल केले. पेट्रोल डिझेलचे दर वाढले हे एप्रिल फुलच आहे. अच्छे दिन येणार, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये येणार यावरून एप्रिल फुलच सुरू आहे. दोन कोटी बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळणार हे एप्रिल फुलच आहे, महाराष्ट्रात किंवा देशात सुडाचे राजकारण करणार नाही, हे एप्रिल फुलच आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, वकील सतिश उके यांनी जरी कुणाची जमीन हडप केली असेल, कुणाला धमकी दिली असेल तर महाराष्ट्र पोलिस त्यांच्यावर कारवाई करेल. या प्रकरणात ईडीचा काय संबंध? त्यामुळे यापुढे ईडी आणि सीबीआयने रेल्वेतील खिसेकापूंचीही चौकशी करावी, असा तिरकस टोला संजय राऊत यांनी लगावला.