आरोग्य-सेतू अ‍ॅपचा जनक कोण ?

गेली आठ महीने कोरोना महामारीशी झुंजणाऱ्या कोट्यावधी नागरीकांना आज मोठा धक्का बसला. आरोग्य सेतू अ‍ॅपच्या माध्यमातून जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुकाची थाप मारुन घेणाऱ्या केंद्र सरकारचा आज अखेर पर्दाफाश झाला. आरोग्य-सेतू अॅप कुणी तयार केलं? हे माहितीच नाही असं धक्कादायक उत्तर केंद्र सरकारने माहीतीच्या अधिकाराच्या उत्तरात दिलं आहे.

Update: 2020-10-28 11:55 GMT

गेली आठ महीने कोरोना महामारीशी झुंजणाऱ्या कोट्यावधी नागरीकांना आज मोठा धक्का बसला. आरोग्य सेतू अ‍ॅपच्या माध्यमातून जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुकाची थाप मारुन घेणाऱ्या केंद्र सरकारचा आज अखेर पर्दाफाश झाला. आरोग्य-सेतू अॅप कुणी तयार केलं? हे माहितीच नाही असं धक्कादायक उत्तर

केंद्र सरकारने माहीतीच्या अधिकाराच्या उत्तरात दिलं आहे.

भारतात मार्च महीन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून लॉकडाऊन आणि अनलॉकची प्रक्रीया सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करण्याचं आवाहन केलं जात होतं. विमान प्रवासासह अनेक ठिकाणी हे अ‍ॅप सक्तीचं देखील करण्यात आलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेनंही या अ‍ॅपचं कौतुक केलं आहे. मात्र, या अ‍ॅपबद्दल केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय माहिती केंद्र यांनी हे अ‍ॅप कुणी तयार केलं याविषयी काहीही माहिती नसल्याचं धक्कादायक उत्तर दिलं आहे.

माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या माहितीवर हे उत्तर आल्यानं आता केंद्रीय माहिती आयोगानं आश्चर्य व्यक्त केलं आहे. केंद्रीय माहिती आयोगाने (CIC) आता कडक भुमिका घेऊन केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी (CPIO), राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) व NeGD यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आरटीयच्या अधिनियमांनुसार कलम २० अंतर्गत गुन्हा का दाखल केला जावू नये? असा सवाल केला आहे. आरोग्य सेतूच्या वेबसाइटवर हे अ‍ॅप एनआयसीच्या प्लॅटफॉर्मवर डिझाईन, डेव्हलप आणि होस्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, एनआयसीला यासंदर्भात माहिती कशी नाही असा सवाल केंद्रीय माहिती आयोगानं केला आहे. केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त एन. सरण यांनी यासंदर्भात लेखी उत्तर मागितले आहे. तसेच त्यांच्याकडे काही माहिती नसल्यास https://aarogyasetu.gov.in/ ही वेबसाइट gov.in या नावाने वेबसाइट कशी तयार केली गेली," असा सवाल करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं आहे.

कोणत्याही केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याने हे अ‍ॅप कोणी तयार केले, फाइल्स कोठे आहेत याबद्दल माहिती दिलेली नाही. केंद्रीय माहिती आयोगाने सौरव दास यांच्या तक्रारीनंतर हे आदेश दिले आहेत. "या प्रकरणात एनआयसी, नॅशनल ई-गव्हर्नन्स विभाग (एनजीडी) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आरोग्य सेतु अ‍ॅप आणि त्याच्या निर्मितीशी संबंधित अन्य प्रक्रियेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. अ‍ॅप तयार करण्याबाबत एनआयसीकडे माहिती नाही असे याचिकेत सांगण्यात आले आहे," असे एन. सरण यांनी सांगितले. "जर तुम्ही हे अ‍ॅप बनवले असेल, तर हे उत्तर आश्चर्यकारक आहे," अशा शब्दात सरण यांनी संबधितांची कानउघडणी केली आहे.

Tags:    

Similar News