रेमडीसीवीर इंजेक्शनवरुन मुंबईत मध्यरात्री राजकीय नाट्य, फडणवीसांच्या भूमिकेवर सवाल
रेमडीसीवीर इंजेक्शनचा साठा केल्याच्या आरोपावरुन एका कंपनीवरील कारवाईला फडणवीस यांनी विरोध केला आहे. यावरुन आता फडणवीस यांना माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी काही सवाल विचारले आहेत.;
राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असताना एका फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्याने रेमडेसिवीरचा साठा केल्याची माहिती मिळाल्याने विलेपार्ले पोलिसांनी ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले होते. पण या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात पोहोचून पोलिसांना जाब विचारला. पण आता या कारवाईवरुन माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी फडणवीस यांना काही सवाल विचारले आहेत.
फडणवीसांचे म्हणणे काय?
दमणमधल्या ब्रुक फार्मा कंपनीकडे 50 हजार रेमडीसीविर इंजेक्शनचा साठा आहे. तो त्यांनी महाराष्ट्राला द्यावा अशी विनंती भाजपने केली होती. कंपनीने परवानगी मिळाल्यास साठा देण्याची तयारी दाखवली. त्याप्रमाणे केंद्रीय मंत्री आणि राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेऊन रेमडीसीवीरचा साठा मिळवण्याचे काम सुरू झाले असताना अशाप्रकारे एखाद्या अधिकाऱ्याला ताब्यात घेणे योग्य नाही, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
पण आता फडणवीस यांच्या या भूमिकेवर माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी सवाल उपस्थित केले आहेत. विलेपार्ले पोलिसांनी 4 कोटी 75 लाख रुपये किमतीचा रेमडीसीवर इंजेक्शनचा साठा जप्त केला, हा साठा एका कंपनीने गुजरातमधून गुप्तपणे मुंबईत आणल्याचा आरोप गोखले यांनी केला आहे. भाजपने वैयक्तिकपणे गुजरातमधून एवढा साठा कसा आणला असा सवालही गोखले यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
@threadreaderapp unroll
— Alex James Murikan (@chennai123) April 18, 2021
साकेत गोखले यांचे सवाल
1. रेमडीसीवीरची खरेदी फक्त सरकार करुन शकत असताना फडणवीस यांनी एवढी इंजेक्शन कशी काय घेतली?
2. फडणवीस यांनी या पुरवठादाराची माहिती राज्य सरकारला का दिली नाही, सरकारच्या माध्यमातून या साठ्याकरीता प्रयत्न का केले नाहीत?
3. राज्यात रेमडीसीवीरचा एवढा तुटवडा असताना भाजपच्या कार्यालयात (गुजरातप्रमाणे) एवढ्या मोठ्या किमतीच्या रेमडीसीवीरचा साठा कसा केला जातो?
4. नवाब मलिक यांनी केंद्रावर आरोप केला असताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला न कळवता गुप्तपणे एवढा साठा कसा मिळवला?
एकूणच रेमडीसीवीरच्या तुटवड्यावरुन सामान्य लोक हैराण झाले असताना राज्यात यावरुन राजकारण तापलेले दिसते.