राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर महाविकास आघाडीच्या काही निर्णयांमध्ये बदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्या व्यक्तींसाठी आपले सरकार असताना पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण महाविकास आघाडी सरकार येताच हा निर्णय स्थगित करण्यात आला होता. पण आता पुन्हा ही पेन्शन सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. मात्र आता सरकारच्य़ा या निर्णयावर टीका सुरू झाली आहे. आरपीआयचे सचिन खरात यांनी याबाबत एक गंभीर आरोप केला आहे.
"ज्या राष्ट्रीय स्वयंसेवकांनी कधीही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही, जे स्वयंसेवक स्वतःला राष्ट्रवादी समजतात त्यांना जाणूनबुजून आणीबाणीच्या नावाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शन योजना जाहीर केली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ फक्त संघाच्या लोकांना होणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना पेन्शन मिळणार आहे त्याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे सचिन खरात यांनी केली आहे.