मुंबई महानगर क्षेत्रातील प्रदूषण अजूनही चितांजनक आहे, असं निरिक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध लावले आहेत. मुंबई महानगर महानगर क्षेत्रात आता रात्री ८ ते १० याच वेळेत फटाके फोडण्यास मुभा दिली आहे बांधकाम ठिकाणी डेब्रिज वाहतूक करण्यावर १९ नोहेंबरपर्यंत बंदी राहणार राहील असे स्पष्ट करताना मुंबईची दिल्ली बनवू नका, अशी तंबी न्यायालयाने राज्य सरकार व महापालिकेला दिली आहे.
मुंबई महानगरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने 'सुमोटो' याचिका दाखल करून घेतली. त्या याचिकेवर शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी घेण्यात आली. खंडपीठाने मागील सुनावणी वेळी राज्य सरकार आणि मुंबई महानगरातील सर्व पालिकांना हवेचा दर्जा सुधारण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. तसेच बांधकाम डेब्रिजची वाहतूक करण्यास मनाई करीत फटाके पडण्याला रात्री 7 ते 10 पर्यंतची मर्यादा आखली होती. त्यावेळच्या निर्देशाला अनुसरून मुंबई महापालिकेतर्फे अॅड. मिलिंद साठे व सरकारतर्फे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी चार दिवसांतील कृतीचा अहवाल सादर केला. त्यातही प्रशासनाचे अपयश दिसून येताच खंडपीठाने पुन्हा राज्य सरकार व पालिकेवर ताशेरे ओढले.
अग्निशमन दलाकडून नियमावली जाहीर
पालिकेच्या अग्निशमन दलाकडून फटाक्यांबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये इमारत, जिन्यात फटाके पडू नयेत, झाडे, ओव्हरहेड वायर आणि उंच इमारतीजवळ हवेत उंच उडणारे फटाके पडू नयेत, असे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे.
दिवाळीत काय काळजी घ्यावी
फटाके फोडताना सुती कपडे परिधान करावेत.
फटाके फोडण्यासाठी अगबत्ती, फुलबाजाचा वापर करावा; लायटर, आगकाडीचा वापर करू नये
फटाके मुलांपासून लांब ठेवावेत.
फटाके फोडताना पादत्राणे वापरावीत.
खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या, दिवे लावू नयेत.
पापिंग, गॅसलाईन, विजेच्या तारांजवळ फटाके लावू नयेत.
रोषणाईसाठी ओव्हरलोड तारांची जोडणी करू नये.