इर्शाळवाडीत पुन्हा बचावकार्याला सुरूवात; आत्तापर्यंत १६ जणांचा मृत्यू

Update: 2023-07-21 05:20 GMT

खालापूर- रायगडच्या इर्शाळवाडी गावात झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेने राज्यभरात शोक व्यक्त केला जात आहे. दरडग्रस्त इर्शाळवाडीत अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या सहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. गुरुवारी बचावकार्य सुरू असताना १०० हून अधिक लोकांना सुखरुप वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. तसेच आतापर्यंत १६ लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. गुरुवारी रात्री अंधार पडल्याने बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर आज शुक्रवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा बचावकार्याला सुरूवात करण्यात आली आहे.

इर्शाळवाडी गावात जाण्यासाठी दोन तासांची पायपीट करावी लागत आहे. तसेच  त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल असल्याने जेसीबी, पोकलेन आणि अन्य यंत्रणा घटनास्थळी नेण्यास मोठे अडथळे निर्माण होत आहेत. हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टरही घटनास्थळी उतरणं शक्य नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

पाऊस सुरू असताना केवळ मनुष्यबळाच्या सहाय्याने इर्शाळवाडीत बचावकार्य सुरू असल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होता. त्यावेळी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास इर्शाळवाडी या गावावर भलीमोठी दरड कोसळली. सुरुवातीला त्यात चार लोकांचा मृत्यू झाला होता. बचावकार्य सुरू करण्यात आल्यानंतर मृतांचा आकडा वाढत गेला. इर्शाळवाडी गावात ५० ते ६० घरांची वस्ती आहे. ढिगाऱ्याखाली ४० ते ५० घरं गाडली गेल्याची माहिती आहे. त्यानंतर आता घटनास्थळी नागरिकांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. 

Tags:    

Similar News