राज ठाकरेंवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करा, सचिन खरात यांची राज्य सरकारकडे मागणी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी राज ठाकरेंवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.;

Update: 2022-03-06 05:30 GMT

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या विधानावर राज्यभरातून प्रतिक्रीया उमटत आहेत. त्यातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी राज ठाकरेंवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढले नाही तर त्यासमोर हनुमान चालिसा लावण्यात येईल, असे विधान केले होते. त्यामुळे राज्यात वादंग निर्माण झाले होते. त्यातच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या विधानावर नाराज होत राजीनामा दिल्याची घटना घडली. त्यापार्श्वभुमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे सचिन खरात म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हे रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुले, शाहु, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचे राज्य आहे. तर या महापुरूषांनी राज्यातील समाज जोडण्याचे काम केले. मात्र राज ठाकरे या समाजात दुहीची बीजं पेरत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राज ठाकरे यांनी वारंवार हम करे सो कायदयाची भाषा केली आहे. तसेच गुढीपाडवा मेळाव्यातही त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजातील एकीला तडा जाऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरे कोण वाईट, कोण चांगला याचे सर्टिफिकेट देऊ शकत नाहीत. त्यांना हा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी मुंबईतील बेहराम पाडा येथील मशिदी आणि मदरसे याबाबतही वादग्रस्त वक्तव्य करून मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.

Tags:    

Similar News