Republic day : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावरून रश्मी ठाकरे अडचणीत, पोलिस आयुक्तांकडे तक्रार
दैनिक सामनाच्या संपादक आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावरून अडचणीत आल्या आहेत. तर त्यांच्या विरोधात पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.;
प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची तक्रार करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अॅड. जयश्री पाटील यांनी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे केली आहे, याबाबत ईटीव्ही भारतने वृत्त दिले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी राष्ट्रगीत सुरू असताना सर्वजण राष्ट्रध्वजाला सलामी देत होते. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि दैनिक सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे या स्तब्ध उभ्या असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. तर ध्वजारोहण प्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि उपस्थित सर्वजण राष्ट्रध्वजाला सलामी देत होते. मात्र त्यावेळी रश्मी ठाकरे या स्तब्ध उभ्या होत्या. त्यांनी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाला सलामी न दिल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान झाला आहे. तसेच लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जयश्री पाटील यांनी केली आहे.
तक्रारदार अॅड. जयश्री पाटील यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देतांना डोक्यावर गांधी टोपी घातली नाही. याबद्दल आक्षेप नाही. कारण कोणी गांधी यांच्या तर कोणी गोडसेंच्या विचाराला समर्थन देऊ शकतात. तो त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. मात्र प्रजासत्ताक दिनी रेड कार्पेटवर राष्ट्रध्वजाला वंदन करणारे उभे असतात. यावेळी न विसरता राष्ट्रध्वजाला सलामी द्यायची असते. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यावेळी स्तब्ध उभ्या असलेल्या दिसत आहे. त्या रेड कार्पेटवर असूनही ध्वजारोहणानंतर सलामी देत नाहीत. हे कोणते शहाणपण असा प्रश्न विचारला आहे. तर तक्रारीत जयश्री पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, रश्मी ठाकरे यांना ध्वज संहिता आणि प्रजासत्ताक मान्य नाही का? असे म्हणत सार्वजनिक कार्यक्रमात ध्वजसंहितेचा अवमान करणे हे संपुर्ण देशाचा अवमान केल्यासारखे आहे. तर राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अक्षम्य अपराध केला आहे. त्यामुळे सामनाच्या संपादक आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असलेल्या रश्मी ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अॅड. जयश्री पाटील यांनी केली आहे.