Maratha reservation : मनोज जरांगेंना प्रत्युत्तर द्या, भाजप आमदारांना सूचना
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी जालना जिल्ह्यातूनच माघार घेतलीय. तसेच अंतरवाली सराटी येथे सतरा दिवसांपासून चालवलेले उपोषण समाप्त करून साखळी उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केलीय. दुसरीकडे, जरांगे यांची विधाने आणि आंदोलनाचे इशारे याविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतल्यानंतर मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान सरकार विरुद्ध जरांगे पाटील असे चित्र तयार झाल्यानंतर, सोमवारी मराठवाड्यातील जालना, बीड, संभाजीनगर या तीन जिल्ह्यांत जाळपोळ, आंदोलने करण्यात आली तर, या प्रकरणाला हिंसक वळणं लागू नये त्यामुळे सुरक्षेच्या यासाठी छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना येथील इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विष प्रयोग केल्याचा जरांगे यांचा आरोप, हत्येच्या कटाचा आरोप करून जरांगे बैठकीतूनच रविवारी मुंबईकडे निघाले होते. मात्र, रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेत जिल्ह्यात संचार बंदी लागू केल्याने जरांगेना माघार घ्यावी लागली.
सरकार कठोर, जरांगेंची माघार!
मराठवाड्यातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अलर्ट राहण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी जरांगे यांच्या सहकाऱ्यांची धरपकड सुरू केलीय.तर दोन ठिकाणी जरांगे यांच्यावरही गून्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी संचारबंदी व जमावबंदीही लागू केलीय. त्यामुळे बैठकीतूनच मुंबईतील सागर बंगल्याकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातील अंबड तालुक्यातील भांबेरी गावातूनच माघार घ्यावी लागलीय. तेथून ते आपल्या आंतरवली सराटी गावात गेले आणि उपोषण सोडल्याची घोषणाही केलीय.
सध्या परीक्षांचा काळ असल्याने जनसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आंदोलन मोडून काढण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. जरांगे यांनी प्रत्येक गावात दररोज ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्याआधारे बीड जिल्ह्यात शिरूर कासार व अंमळनेर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांवर राज्यभरात गेल्या काही महिन्यांत एक हजार 40 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान गेल्या काही दिवसांत सुमारे 80 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी किरकोळ स्वरूपाचे 36 गुन्हे आहेत.
सरकार विरुद्ध जरांगे संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मराठवाड्याच्या काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. अंबड तालुक्यातील तीर्थपुरी गावात जमवाने एसटी बस पेटवून दिलीय. तर छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यातील एसटी सेवा बंद करण्यात आलीय. तिन्ही जिल्ह्यांतील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली असून त्याचा फटका सामान्य व्यवहारांनाही बसला आहे.
आता पुन्हा साखळी उपोषण
पुन्हा जनतेत जाऊ,असे सांगत जरांगे यांनी सतराव्या दिवशी उपोषण स्थगित केलेय. उपचारानंतर पुन्हा गावोगावी जाऊ तेव्हा समाजबांधवांनी जेसीबीमधून पुष्पवृष्टी करू नये किंवा मिरवणुका काढू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. उपोषण स्थगित होत असले, तरी आंतरवाली सराटी येथे चौघांचे साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. दहा टक्के नको, तर ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे. त्यासाठी सरकारने ‘सगेसोयरे’ अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीचा पुनरुच्चार जरांगे यांनी केलाय.