मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या, भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

Update: 2022-02-26 08:16 GMT

मुंबई : देशात हिजाब मुद्द्यावरून वाद पेटला असतानाच मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या आमदाराने केले आहे. ते बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील बिसफी येथे बोलत होते. देशात हिजाब मुद्द्यावरून धार्मिक तणाव निर्माण झाला असतनाच बिहार भाजपचे आमदार हरीभुषण ठाकुर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तर या वक्तव्यानंतर बिहार भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावून वक्तव्यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे.

हरीभुषण ठाकुर यांनी बोलताना म्हटले की, 1947 मध्ये देशाची फाळणी झाली. त्यावेळी आपण मुस्लिमांना वेगळा देश दिला आहे. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानात जायला हवे. अन्यथा त्यांना भारतात रहायचे असेल तर त्यांनी दुय्यम दर्जाचे नागरीक म्हणून रहायला हवं. त्यामुळे सरकारला विनंती करतो की त्यांनी मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्यावा.

मुस्लिम एका अजेंड्यानुसार काम करतात. त्यांचा भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचा विचार आहे, असे वादग्रस्त वक्तव्य ठाकुर यांनी केले. यापुर्वीही ठाकुर यांनी अशाच प्रकारचे वक्तव्य केले. यापुर्वी बिहार विधानसभेच्या सभापतींनी वंदे मातरम् न म्हणणारांविरोधात कारवाई करण्याची मागणी ठाकुर यांनी केली होती. तसेच राष्ट्रगीत किंवा वंदे मातरम गाणार नसतील तर ते पाणी पिणे थांबवणार आहेत का? असं ठाकुर यांनी म्हटले होते.

मात्र हरीभुषण ठाकुर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर जदयूचे प्रवक्त्यांनी ठाकुर यांना नागरीकत्वाविषयी ज्ञान नसल्याने भारतात राहणाऱ्या नागरीकांच्या नागरीकत्वाबद्दल निर्णय घेणारे ते कोण आहेत? असा सवाल जदयूच्या नेत्यांनी केला. तसेच ठाकुर हे फक्त प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत, असे मत जदयूच्या नेत्यांनी व्यक्त केले.

Tags:    

Similar News