पुणे: आरोग्य खात्याच्या गाड्यांना रिलायन्स पुरवणार पेट्रोल, डिझेल!

Update: 2021-05-24 12:15 GMT

पुणे जिल्ह्यातील सरकारी आरोग्य यंत्रणेच्या कोरोना काळातील वैद्यकीय आपत्कालीन उपाययोजना करणाऱ्या सर्व रुग्णवाहिकांना येत्या ३० जून २०२१ पर्यंत प्रति दिन, प्रति वाहन कमाल ५० लिटर पेट्रोल व डिझेल मोफत पुरवले जाणार आहे.

यासाठी रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड कंपनीने पुढाकार घेतला असून, पुणे जिल्ह्यासाठी ही योजना आहे. जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी या संदर्भात रिलायन्स कंपनी ला पत्र दिले असून, वैद्यकीय सेवा देणाऱ्या जिल्ह्यातील १०८ व १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका आणि इतर शासकीय वाहने यांना जास्तीत जास्त ५० लिटर प्रति वाहन, प्रतिदिवस मोफत इंधन पुरवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील सर्व वाहनांची यादी आयुष प्रसाद यांनी रिलायन्स कंपनीकडे दिली आहे. आता येत्या ३० जून २०२१ पर्यंत शासनाच्या वाहनांना, जी वाहने कोरोना च्या काळामध्ये रुग्णांची सेवा करत आहेत. ती डिझेलविना कुठेही थांबणार नाहीत. त्याचबरोबर शासकीय रुग्णवाहिका इंधनाच्या बाबतीत कुठल्याही अडथळ्याशिवाय धावतील आणि त्याची तोशीस सरकारी यंत्रणेवर पडणार नाही.

Tags:    

Similar News