रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्त आक्रमक, थेट अंबानींच्या घरावर धडक देण्याचा इशारा...
रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता... ६ दिवसांनंतरही तोडगा नाहीच...;
रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्तांनी गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या बाहेर ठिय्या दिलेला आहे. पण कंपनीकडून कोणताही तोडगा काढला जात नसल्याने आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी आता थेट मुंबईमध्ये अंबानींच्या घरावरच धडक देण्याचा इशारा दिला आहे
पूर्वीची आयपीसीएल व आत्ताची रिलायन्स कंपनी करीता ज्या स्थानिक भूमिपुत्र, शेतकऱ्यांची जमीन भूसंपादीत करण्यात आली. त्यांना नोकरी देण्याचा सरकारचा करार आहे, मात्र हे व्यवस्थापन आडमुठे पणाची भूमिका घेत आहे. जनशक्तीची त्यांना कल्पना नाही. त्यामुळे रिलायन्स नागोठणे येथे आम्हाला न्याय न मिळाल्यास हजारो प्रकल्पग्रस्तांसमवेत अंबानींच्या घरावर धडक देऊ असा इशारा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी दिला आहे.
रिलायन्स नागोठणे कडसुरे मटेरियल गेटसमोर सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी सायंकाळी उशिरा तिसऱ्यांदा बी जी कोळसे पाटील यांनी भेट दिली.
जेल , पोलीस व मरणाला भिणारे आम्ही नाहीत, आम्हाला गोळ्या घाला, जेलमध्ये टाका आम्ही मागे हटणार नाही, न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहणार असा इशारा बी जी कोळसे पाटील यांनी यावेळी दिला.
सहाव्या दिवशीहदिवशीही रिलायन्स व्यवस्थापन व आंदोलनकर्ते यांचे शिष्टमंडळ यांच्यात बैठक पार पडली, मात्र बैठक निष्फळ ठरल्याने आंदोलकांनी आपले आंदोलन पुढे सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली.
रिलायन्सचे म्हणणे काय?
या आंदोलनाच्या पाश्वभूमीवर रिलायन्स व्यवस्थापनाकडून मात्र आंदोलनकर्त्यांच्या मागण्या अवाजवी व अवास्तव असल्याचे वारंवार सांगितले जाते, त्यामुळे या आंदोलनाचा तिढा कधी व कसा सुटणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
याविषयी प्रतिक्रिया देताना रिलायन्स जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे म्हणाले की, "लोकशासन आंदोलन संघर्ष समितीने सादर केलेल्या मागण्या या बेकायदेशीर, अवाजवी व अवास्तव आहेत. काही मागण्यांवर विविध शासकीय पातळीवर चर्चा चालू आहे. असे असूनही कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्याबरोबर मिटींग घेऊन व प्रसिध्दीपत्रक काढून त्यांना आंदोलन थांबवून चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न देता हे आंदोलन सुरु ठेवत व्यवस्थापनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदरहू संघटना लोकांना खोटी आश्वासने व प्रलोभने दाखवत आहे व चूकीची माहिती देऊन गैरसमज पसरवत आहे व त्याचप्रमाणे लोकांची दिशाभूलही करत आहे."
असा आरोप रिलायन्सने केलेला आहे.