दिल्लीतील लाखो शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तेवत राहील:बी जी कोळसे पाटील
SOCIAL MEDIA ANCHOR: केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी जाचक धोरणांविरोधात दिल्लीत लाखो शेतकरी कित्येक दिवसांपासून न्यायासाठी ठाण मांडून बसले आहेत. आम्हीही शेतकरी आहोत. आम्हाला ऊन, वारा, पाऊस, थंडीची तमा नाही, दिल्लीतील लाखो शेतकऱ्यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे, त्यामुळे रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन न्याय मिळेपर्यंत कायम तेवत राहील असा इशारा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी दिला.;
रविवारी दि.(13)रोजी कोळसे पाटील यांनी रिलायन्स नागोठणे मटेरियल गेट समोर ठिय्या आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना भेट दिली, त्यावेळेस कोळसे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बी जी कोळसे पाटील यांनी स्वतः आंदोलनकर्त्यांसमवेत पंक्तीत बसून जेवण करून मी सर्वांगाने तुमच्या सोबत आहे असा विश्वास दिला. रिलायन्स व्यवस्थापन आंदोलकांना आंदोलन मागे घ्या मग सकारात्मक चर्चा करू असे म्हणते,मात्र असा उधार सौदा कुणाच्या बापाने केला होता का? असा सवाल बी जी कोळसे पाटील यांनी उपस्थित केला. जगाच्या इतिहासात जनशक्ती कधीच हरली नाही, आपला विजय निश्चित होईल असा विश्वास कोळसे पाटील यांनी दर्शविला. रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन 17 व्या दिवशीही सुरूच राहिले. अशातही प्रकल्पग्रस्तांचा जोश व ऊर्जा कायम दिसून येत आहे. कोळसे पाटील पुढे म्हणाले की पूर्वीची आयपीसीएल व आत्ताची रिलायन्स कंपनी करीता ज्या स्थानिक भूमिपुत्र, शेतकऱ्यांची जमीन भूसंपादीत करण्यात आली.
त्यांना नोकरी देण्याचा सरकारचा करार आहे, मात्र हे व्यवस्थापन आडमुठे पणाची भूमिका घेत आहे. प्रकल्पग्रस्तांचा मुक्काम वाढत असून त्यांचे हाल पाहून डोळ्यात पाणी येते, मात्र व्यवस्थापनाला पाझर फुटत नाही. आमच्या मागण्या रास्त व न्यायिक आहेत. त्यामुळे जोपर्यंत आमच्या पदरात न्याय पडत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही असे बी जी कोळसे पाटील यांनी ठणकावून सांगितले. कंपनी जगली पाहिजे , टिकली पाहिजे ही आमची भूमिका आहे, त्यामुळे कंपनीचे आम्ही नुकसान करणार नाही. जगातील सर्व गोरगरीब कष्टकरी, श्रमजीवी , शेतकरी वर्गाने एक होऊन अन्यायाविरोधात आवाज उठविला पाहिजे.
प्रकल्पग्रस्तांचा लढा संविधानिक मार्गाने व कायद्याच्या चौकटीत आहे. आम्ही आजवर अहिंसक मार्गाने अनेक लढे जिंकले आहेत, आम्ही एकही आंदोलन हरलेलो नाही हा आमचा इतिहास आहे. जेल , पोलीस व मरणाला भिणारे आम्ही नाहीत, आम्हाला गोळ्या घाला, जेलमध्ये टाका आम्ही मागे हटणार नाही, न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहणार, असा इशारा बी जी कोळसे पाटील यांनी यावेळी दिला. रायगड जिल्हाधिकारी परक्याप्रमाणे आम्हाला भेटत नाहीत, कंपनीत भेट घेऊन जातात पण आंदोलनकर्त्यांना भेटत नाहीत याचे आश्चर्य वाटत असे कोळसे पाटील यावेळी म्हणाले. आम्ही तलवार चालवणार नाही, लाठी काठी अथवा शिवीगाळ करणार नाही, मात्र संविधानाने दिलेल्या अधिकाराने संघटन करून अहिंसक मार्गाने अन्यायाविरुद्ध पेटून आंदोलन करू असे कोळसे पाटील म्हणाले. पोलीस व जवान हे आमच्याच मातीतील सुपुत्र आहेत, शेतकऱ्याने पिकवलेले धान्य खाऊनच ते मोठे झालेत, त्यामुळे ते सारे आपले मित्रच आहेत असे कोळसे पाटील म्हणाले. ज्या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी असतात ते आंदोलन यशस्वी होतेच असा विश्वास दर्शवित आजवर महिला भगिनींच्या सहभागाने अनेक आंदोलने जिंकली आहेत, हा लढाही आम्ही जिंकू असे कोळसे पाटील म्हणाले. आम्ही अनेक आंदोलन केली, आमच्या लढ्यात आंदोलक चर्चेला जातात, मी कधीही चर्चेला अथवा तडजोडीला जात नाही, त्यामुळे बी जी कोळसे पाटील कधीच विकला जाणार नाही असे देखील त्यांनी ठणकावून सांगितले. कंपनीत कष्ट करणारे कामगाराला गुलाम समजू नका, येथे रक्त आटविणारे कामगार यांना त्यांच्या श्रमाच्या एक दशांश मोबदला देखील मिळत नाही.
कामगार हे मूळ मालक आहेत, त्यांच्या जीवावर कारखाना उभा आहे. याची जाणीव ठेवली पाहिजे. कंपनी चे आपण मालक आहोत, कंपनी जगली पाहिजे , सुरक्षित राहिली पाहिजे ही आमची कायम भूमिका राहिली आहे. असे बी जी कोळसे पाटील म्हणाले. यावेळी बी जी कोळसे पाटील यांनी आजवरच्या अनेक आंदोलनाचा इतिहास उजागर केला. आंदोलनाचा सतरावा दिवस असून देखील आंदोलनकर्त्यांचा जोश व ऊर्जा कायम पाहायला मिळत आहे. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, कोण म्हणतोय देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय, गोळी खाएंगे लाठी खाएंगे लेकीन पीछे नही हटेंगे, लढेंगे जितेंगे या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे, वारकरी समुदाय या आंदोलनाला जोडला गेला आहे. भजन व कीर्तनाने वातावरण भक्तिमय केले जात आहे, तर सकाळ व सायंकाळच्या सत्रात क्रांतिकारी भाषणे आंदोलनकर्त्यांना प्रचंड ऊर्जा देत आहेत. अशाप्रकारचे धडाकेबाज, मात्र शिस्तबद्ध आंदोलन नागोठण्याचा इतिहासात पहिल्यांदाच झाले असल्याचे बोलले जात आहे. लोकशासन आंदोलन संघर्ष समिती
कल्याणी फोर्स कामगार युनियन राज्य उपाध्यक्ष अर्जुन फसाळे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करून उर्जित केले. फसाळे म्हणाले की स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांनी ऐक्याची वज्रमुठ आवळून 36 वर्षाचा हा लढा पुन्हा जिवंत केला आहे, या लढ्याचे नेतृत्व लढाऊ नेते उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील करीत आहेत.
आम्ही यापूर्वी 84 दिवसाचे आंदोलन केले व जिंकले. ज्यांनी आजवर केलेले प्रत्येक आंदोलन लढा यशस्वी केला आहे. हा इतिहास आहे. आपल्या हातात नोकरी मिळाल्याशिवाय येथून हटायचे नाही. आपण जिंकणारच असा विश्वास व्यक्त केला. या आंदोलनाला स्वराज्य प्रतिष्ठान रायगड , लोकशासन आंदोलन कल्याणी फोर्स कामगार युनियनचे पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला. आंदोलनकर्त्यांना दानशूर व्यक्तींकडून अन्नदान दिले जात आहे.
या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र गायकवाड, शशांक हिरे , गंगाराम मिणमिणे , प्रमोदिनी कुथे , चेतन जाधव , सुरेश कोकाटे , बळीराम बडे , अनंत फसाळे , प्रशांत शहासने , तेजस मिणमिणे , जगदीश वाघमारे , सुजित शेलार , प्रमोद कुथे , एकनाथ पाटील , मोहन पाटील , गुलाब शेलार , नीता बडे , उषा बडे , निलेश शेलार , जनार्दन घासे , गौतमी शेलार , रूपा भोईर आदींसह नागोठणे ते चोळे विभागातील शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले आहेत . आंदोलनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.