प्रारंभापासून ते 2022 पर्यंतच्या 560 दलित साहित्यिकांचा तब्बल 1428 पानांच्या या कोशात आढावा
मुंबई, दिनांक 27 सप्टेंबर
'फुले आंबेडकरी वाडःमयकोश' या दलित साहित्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या कोशग्रंथाचे प्रकाशन सोमवारी मुंबईत प्रख्यात विचारवंत डाॅ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई प्रेस क्लब मध्ये सायंकाळी 5.30 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात साहित्यिक श्री. अर्जुन डांगळे राहतील. प्रसिद्ध समिक्षक डाॅ. अनंत देशमुख आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव डाॅ. मिनाक्षी पाटील या कोशग्रंथाबद्दल बोलतील.
१९६० च्या दरम्यान उदयाला आलेल्या दलित साहित्याने सहा साडे सहा दशकांचा कालखंड पूर्ण केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, त्यांनी सुरु केलेली वृत्तपत्रे, त्या वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेले साहित्य, आंबेडकरी जलसे, आंबेडकरी लोकगीते आणि दलित साहित्य व या साहित्याचा झालेला विकास ही या देशातील ऐतिहासिक घटना आहे. याला महात्मा फुल्यांपासूनचा वारसा आहे. त्यांचे एकूण साहित्य आणि समाजकार्याने ही समग्र चळवळ प्रभावित आणि समृद्ध झालेली आहे. हा इतिहास समाजाला, विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना अवगत व्हावा यासाठी “फुले आंबेडकरी वाङमय कोश” निर्माण करण्यात आला आहे. तब्बल 1428 पानांच्या या कोशात आंबेडकरपूर्व, आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर अशा तिन्ही कालखंडातील सुमारे 560 लेखक, त्यांचे साहित्यातील योगदान व साहित्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे.
प्रसिद्ध दलित साहित्यिक डाॅ. महेंद्र भवरे हे या ग्रंथाचे मुख्य संपादक असून सर्वश्री. डाॅ. अशोक इंगळे, राम दोतोंडे, डाॅ. सुनील अवचार, डाॅ. मच्छिंद्र चोरमारे, डाॅ. अशोक नारनवरे, डाॅ. प्रकाश मोगले, डाॅ. भास्कर पाटील, पंडित कांबळे, डाॅ. ज्ञानेश्वर कांबळे यांच्या संपादक मंडळाने हा ग्रंथ सिध्द केलेला आहे.
कोश वाडःमय प्रसिद्ध करण्याचा लौकिक असलेल्या पुण्याच्या डायमंड प्रकाशनाने हा कोश प्रसिद्ध केला आहे. हा त्यांचा 37 वा कोशग्रंथ आहे.