जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक मजबूत होतील - बायडेन

Update: 2021-09-25 02:46 GMT

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक मजबूत आणि दृढ होतील अशी ग्वाही अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांची व्हाइट हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चेसाठी भेट घेतली. यावेळी, जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही ग्वाही दिली. दरम्यान अमेरिकेतील 40 लाख भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक अमेरिकेला अधिक मजबूत बनवत आहेत, असे बायडेन यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री आणखी मजबूत करण्याचे बीज रोवले गेले आहे. पहिल्या द्विपक्षीय बैठकीत हवामान बदल, आर्थिक सहकार्य, कोरोनाची साथ यांसह अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली.

दोन्ही राष्ट्रातील ही द्विपक्षीय बैठक अत्यंत महत्त्वाची असून, या शतकाच्या तिसऱ्या दशकाच्या प्रारंभी आपण भेटत आहोत. या दशकाला आकार देण्यात आपले नेतृत्व निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल,असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांचे कौतुक केले. सोबतच अमेरिकेच्या प्रगतीत भारतीय वंशाचे नागरिक सक्रीय सहयोग देत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान पंतप्रधान मोदी यांची ही सातवी अमेरिका भेट आहे.

दरम्यान या भेटी वेळी जो बायडेन म्हणाले की , भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. जगातली सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या या देशांतील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील.

Tags:    

Similar News