खडकदेवळा येथे कपाशी पिकांवर लाल्या सदृश्य रोग

Update: 2021-09-21 12:54 GMT

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात सध्या संपूर्ण बऱ्यापैकी पाऊस झाला आहे.पाचोरा तालुक्यातील शेतकरी कपाशीचे विक्रमी उत्पादन घेत असतो. भरमसाठ खर्च करून हे उत्पादन घेतले जात असले तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी उत्पादन घट होताना दिसत आहे. त्यामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आला असताना , आता शेतकऱ्यांसमोर आणखी एक नवं संकट उभं ठाकलं आहे.

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बु।। येथील शेतकरी बाबुलाल चौधरी यांच्या कपाशीवर लाल्या सदृश रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे कपाशीचे पाने लाल होत असून ती करपत आहेत. मावा व तुडतुडयांनी देखील कपाशीवर हल्लाबोल केल्याने शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. तरी देखील रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे शेतकरी सांगतात.

दरम्यान कृषी विभाग आणि कृषी सेवा केंद्र चालकांकडून वेगवेगळ्या औषधांची शिफारस केली जात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितं पूर्णतः बिघडली आहेत. रासायनिक कीटकनाशक कंपन्याच्या वाढलेल्या स्पर्धेमुळे नेमके कोणते किटकनाशक फवारावे याबाबतही शेतकरी संभ्रमात आहे. त्यातच कृषी सेवा चालक त्यांना अधिक नफा मिळेल तीच औषधी शेतकऱ्यांच्या मस्तकी मारत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

एकंदरीत या भागातील शेतकऱ्यांचे कपाशी हे पीक लाल्यासदृश रोगाने ग्रासलं असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. यासाठी संबंधित विभागाने या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे अशी मागणी खडकदेवळा बुद्रुक येथील शेतकरी बाबुलाल चौधरी यांनी केली आहे.

Tags:    

Similar News