केंद्र सरकारने केलेले कॉर्पोरेट धार्जिणे व शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला निर्णायकरित्या आणखी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई असा १५,००० शेतकऱ्यांचा भव्य राज्यव्यापी वाहन मोर्चा कालपासून सुरू झाला आहे.
रात्रीच्या मुक्कामानंतर आज सकाळी घाटनदेवी येथून निघून हजारो शेतकऱ्यांनी कसारा घाट उतरून मुंबईच्या दिशेने कूच केली...शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहेत.
26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर राष्ट्रध्वज फडकवून, राष्ट्रगीत गाऊन आणि शेतकरी-कामगारांचे हे आंदोलन विजयी करण्याचा निर्धार करून या महामुक्कामाची सांगता होणार आहे.