कुणाच्या धमक्यांमुळे अदर पुनावाला यांचा भारत सोडून लंडनमध्ये मुक्काम?

Update: 2021-05-01 15:58 GMT

कोरोना संकटावर एकमेव पर्याय असलेल्या लसींचा तुटवडा सध्या मोठ्या प्रमाणात जाणवतोय. सध्या भारतात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन या दोन लस दिल्या जात आहेत. ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेन्का यांच्यासोबत भारतातील सिरम इन्स्टिट्युटने मिळून कोविशिल्ड लस बनवली आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला सध्या दररोज चर्चेत असतात. पण आता पुनावाला एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. अदर पुनावाल सध्या लंडनमनध्ये मुक्कामी आहेत आणि आपण आपला मुक्काम इथे वाढवला आहे, कारण कोविशिल्ड लसीचा पुरवठा करण्यासाठी अनेक वजनदार लोकांनी फोन करुन आपल्यावर धमक्या दिल्याची माहिती पुनावाला यांनी लंडनमधील 'द टाईम' या वृत्तपत्राला दिली आहे. पुनावाला यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये हे धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यामुऴेच आपण पत्नी आणि मुलांसह भारत सोडून लंडनमध्ये येऊन राहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

"मी सध्या लंडनमधला मुक्काम वाढवला आहे. कारण मला पुन्हा त्या परिस्थितीमध्ये जायचे नाही. प्रत्येक गोष्ट माझ्या खांद्यावर ढकलून दिली जात आहे, मी एकटा हे करु शकत नाही. मी फक्त माझे काम करत आहे, पण तरीही काही व्यक्तींच्या लस पुरवठ्याची मागणी पूर्ण करु शकत नसल्याने ते काय करतील हे मला कळत नाही, अशा परिस्थितीमध्ये मला पुन्हा रहायचे नाहीये." असे पुनावाला यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

पण धमक्या देणारे हे वजनदार लोक कोण, त्यांनी थेट लसींच्या पुरवठ्याची मागणी केली आहे का, याबाबत पुनावाला यांनी या मुलाखतीमध्ये माहिती दिलेली नाही. सध्या देशात कोरोनावरील लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यातच सिरम इन्स्टिट्यूटच्या पुनावाला यांच्यावर लसींची किंमत जास्त ठेवल्याचीही टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रासाठी लसींची किंमत 100 रुपयांनी कमी केल्याची घोषणाही नुकतीच केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुनावाला यांनी लंडनमध्ये जाऊन मोठा आरोप केल्यानं एकप्रकारे भारताच्या प्रतिमेलाही धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

Tags:    

Similar News