RBI कडून रेपो रेटमध्ये वाढ, EMI महागणार?

गेल्या अनेक दिवसांपासून देशात वाढत असलेल्या महागाईच्या पार्श्वभुमीवर अखेर रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केली.

Update: 2022-08-05 08:01 GMT

गेल्या अनेक दिवसांपासून देशात वाढत असलेल्या महागाईच्या पार्श्वभुमीवर अखेर रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केली.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रेपो दरात अर्ध्या टक्क्याने वाढ केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता रेपो रेट हा 5.4 टक्के इतका झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्था ही महागाईशी झुंज देत आहे. त्यातच 13.3 अब्ज डॉलर इतके भांडवल देशातून बाहेर गेले असल्याची कबुली रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. मात्र त्यानंतरही भारतीय अर्थव्यवस्थेत पुरेसे भांडवल असून आगामी काळात येणाऱ्या जागतिक मंदीला पचवू शकेल इतके परकीय चलन भारताकडे आहे, असंही दास म्हणाले.

शुक्रवारी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात जीडीपीची वाढ ही 7.2 टक्क्यांवर राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तर आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 16.2 टक्के इतकी जीडीपीची वाढ होती. तर दुसऱ्या तिमाहीत 6.2 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 4 टक्के तर चौथ्या तिमाहीत 4.1 टक्के इतकी वाढ राहण्याची शक्यता आहे.

याबरोबरच शक्तीकांत दास यांनी यावेळी सांगितले की, 2023-24 या आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेचा किंवा जीडीपी वाढीचा दर हा 6.7 टक्के इतका राहील.

रेपो रेट म्हणजे काय? (What is Repo rate)

रेपो रेट ही बँकींग क्षेत्रातील एक संकल्पना आहे. ज्यामध्ये देशातील बँकांना आपला दैनंदिन व्यवहार करण्यासाठी जे अल्पमुदतीचे भांडवल हवे असते. ते भांडवल देशातील बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज रुपाने घेतात. त्यामुळे या बँकांना रिझर्व्ह बँकेकडून देण्यात येणाऱ्या कर्जाच्या दराला रेपो रेट असे म्हणतात.

रुपो रेट वाढल्याने त्याचा सामान्य माणसांवर काय परिणाम होतो?

जेव्हा रेपो रेट वाढतो. त्यावेळी देशातील बँकांना मिळणाऱ्या निधीवर जास्त व्याज द्यावे लागते. त्यामुळे हा व्याज रुपाने देण्यात येणारा तोटा भरून काढण्यासाठी देशभरातील बँका कर्जाचे दर वाढवतात. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज तसंच ईएमआयच्या दरात वाढ होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या कर्जाचे दर वाढण्याची शक्यता असते.

याऊलट बँकांकडे अतिरीक्त निधी असेल तर तो निधी बँका रिझर्व्ह बँकेकडे ठेवतात. त्यावर रिझर्व्ह बँकेकडून देण्यात येणाऱ्या व्याजाला रिव्हर्स रेपो रेट (Reverse Repo Rate) असे म्हणतात.

Tags:    

Similar News