नाशिक// नाशिक महापालिका निवडणुकीसाठीच्या 133 जागांसाठी कच्च्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे, त्यानुसार 43 प्रभाग 3 सदस्यीय, तर एक प्रभाग 4 सदस्यीय असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या कामासाठी 30 नोव्हेंबरची मुदत दिली होती. मात्र, अनेक बदल झाल्याने थोडा विलंब झाल्याचे कळते.
कोरोनामुळे यावर्षी होणारी जनगणना झाली नसल्याने जुन्या जनगणनेनुसारच प्रभागरचना करण्याचे काम सुरू आहे. या काळात शहराच्या लोकसंख्येत साधारणतः साडेतीन लाखाची वाढ झाली. सध्या सुमारे 30 लाखांच्या घरात नाशिकची लोकसंख्या असल्याने शहरात 151 नगरसेवक असावेत, असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र, त्याऐवजी नगरेसवकांची संख्या 122 वरून 133 अशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. नाशिक महापालिकेत एकूण 61 प्रभाग आणि 122 नगरसेवक, तर पाच स्वीकृत नगरसेवक आहे. सध्याच्या निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभागरचना आहे. त्यानुसार नाशिकमधील प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम 6 ऑक्टोबरपासून सुरू झाले.
नाशिकमध्ये सुरुवातीला निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभागरचनेसाठी कच्चा आराखड्याचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभागरचना झाल्याने, या कामात पुन्हा बदल झाला. त्यातच नगरसेवकांची संख्या 122 वरून 133 वर नेण्यात आली असल्याने आता पुन्हा या कामात बदल करावा लागणार आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार साधरणतः 36 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होता. मात्र, नगरसेवकांची संख्या वाढल्यानंतर आता एका प्रभागाची लोकसंख्या 28 ते 30 हजारांच्या घरात असेल.