डिसले गुरूजी दोषीच, चौकशी समितीचा अहवाल जाहीर
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेल्या रणजितसिंह डिसले यांना दोषी ठरवत चौकशी समितीने अहवाल जाहीर केला आहे. पण या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात...;
ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले हे अनेक दिवसांपासून वादात सापडले होते. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी रणजितसिंह डिसले गुरूजी यांच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. त्या समितीचा अहवाल आला आहे. त्यामध्ये रणजितसिंह डिसले गुरूजी दोषी आढळले आहेत.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर प्रतिनियुक्तीवर असताना ग्लोबल पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले गुरूजी हे कामाच्या ठिकाणी गैरहजर राहिले. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी करून अहवाल दिला होता. मात्र त्यावर जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी चौकशी अहवालाची खातरजमा करण्यासाठी संजय जावीर या उपशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठीत केली होती. या चौकशी समितीने अहवाल सादर केला असून त्यामध्ये रणजितसिंह डिसले गुरूजी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
डिसले गुरूजी यांनी प्रतिनियुक्तीवर असतानाचा रिपोर्ट सादर केला. मात्र त्यानंतर ते निघून गेल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली. तसेच रणजितसिंह डिसले यांनी हजेरी पत्रकावर एकदाही स्वाक्षरी केली नसल्याचे चौकशी अहवालात समोर आले.
रणजितसिंह डिसले यांनी 1 नोव्हेंबर 2018 पासून ते 30 एप्रिल 2020 या कालावधीत एकही दिवस जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर याठिकाणच्या कार्यालयात हजर राहिले नाहीत, असेही चौकशी अहवालात समोर आले आहे.
तसेच कदमवस्ती (परितेवाडी) या शाळेत रणजितसिंह डिसले हे मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांनी शाळेचा आर्थिक व्यवहार अनधिकृतपणे केला असल्याचे समोर आले. त्यामुळे डिसले गुरूजी यांच्यावर कारवाई होणारच असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले.