सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या; डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी रामदास आठवले यांची प्रतिक्रिया
डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी आज केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मानपाडा पोलीस ठाण्यास भेट दिली. डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरण गंभीर आहे. यातील 33 आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सोबतच डोंबिवली प्रकरणातील पीडीतेलाही 20 लाखाची मदत करण्यात यावी असे मुख्यमंत्र्यांना मी सांगणार आहे असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान रिपब्लिकन पार्टीच्यावतीने आज आठवले यांनी पीडीतेच्या कुटुंबियांना एक लाखाच्या मदतीचा धनादेश दिला. डोंबिवलीकरांनीही पूढे येऊन पीडीतेच्या कुटुंबियांना मदत करावी असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा करावा
मराठवाड्याचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील पिके पावसामुळे उध्वस्त झालेली आहे. शेतकऱ्यांना मोठी मदत देण्यासाठी राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे. कोकणातही अशा प्रकारचे संकट आले होते. नाशिकमध्येही द्राक्ष बागांचे नुकसान झालेले आहे. राज्यावर अनेक प्रसंग आले असताना राज्य सरकारकडून केवळ आश्वासन दिले जाते. मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याचा दौरा करुन भरीव मदत दिली पाहिजे याकडे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
'त्या'पार्टी प्रकरणात कारवाई झाली पाहिजे
जहाजावर पार्टी सुरु असल्याची माहिती मिळताच एनसीबीने छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत शाहारुख खानचा मुलगा असो किंवा कोणी असो. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. फिल्म इंडस्ट्रीजला ड्रग्जची लागण झालेली आहे. महाराष्ट्र आणि मुंबईही ड्रग्ज मुक्त झाली पाहिजे अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची टिका
राज्य सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली. या दोन वर्षात सरकारने रस्त्यावरी खड्डे बुजविण्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यांचे लक्ष केवळ सत्ता टिकविण्याकडे आहे. त्यांचे लक्ष फक्त एकमेकांवर आरोप करण्याकडे आहे. खड्डे बुजविण्याचे काम केले जात नाही. खड्डे जर बुजविले नाही तर हे सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांनी खडडेमुक्त महाराष्ट्र करण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.